सोमवार, ६ नोव्हेंबर, २०२३

670. प्रत्यक्षाहूनी प्रतिमा सुंदर

 घटना तशी वीसेक वर्षांपूर्वी आहे . मी माझ्या मुलीला चिन्मयीला एका वांद्रे येथील शाळेत आंतरशालेय एकपात्री अभिनय स्पर्धेकरिता घेऊन गेले होते. तिथे दोन लांबसडक वेण्या आणि परकर पोलक्यातल्या चिऊला पाहून तेथील नववीतील काही मुलामुलींनी विचारलं ,"व्हाॅट शी इज गोईंग टू पर्फार्म?"मी त्यांना सांगितलं "शी इज गोईंग टू पर्फार्म  'मुक्ताई' " समोरून प्रश्न आला, "हू इज धिस मुक्ताई....."आणि तेव्हा मी दचकलेच. अमृताच्या पैजा जिंकणारी अवीट गोडीची ज्ञानेश्वरी ज्यांनी आपल्या वयाच्या सोळाव्या वर्षी लिहिली त्या ज्ञानेश्वर माऊलींची लाडकी धाकटी भगिनी संतशिरोमणी मुक्ताई... ज्या मुलांना माहिती नाही त्यांना आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल काय माहिती असणार ? खरतर वीस वर्षांनी ही परिस्थिती आजही खुप काही बदलेली आहे असं मला वाटतं नाही . पण खरच काळाच्या ओघात 'हम दो हमारे दो' म्हणणारे आता 'हम दो हमारा एक ' वरून लिव्हिंग रिलेशनशिपवर आले आहेत त्यांच्याकडून संस्कृती.... संस्कार यांची खरच अपेक्षा करावी का ? स्टाईल म्हणून नववर्षाच्या स्वागत यात्रेत नऊवारी साडी नेसून नथी संभाळत ढोल ताशाच्या पथकात मिरवणाऱ्या आजच्या तरुण मुली दुसऱ्याच दिवशी कोपऱ्यावर हाफ चड्डीत सिगारेटचे धूर सोडताना दिसतात. वीस वीस तास नोकरीच्या निमित्ताने अहोरात्र एकत्र काम करणाऱ्या त्यांच्या आई-बाबांची ही ' घरवाली - बाहरवाली ' अशी प्रकरणं हे म्हणजे घर घर की कहानी असं झालं आहे. खरंच कोण , कुठे आणि कसं चुकत गेलं .... ते कळलंच नाही. चाळीतल्या एका दहा बाय दहाच्या खोलीत दहा - बाराजणांच्या संसारात खस्ता खाता खाता आपल्या पणजी , आजी आणि आईचा जन्म गेला . आठवड्याला मिळणाऱ्या सहा रुपयांच्या पाॅकेटमनी मध्ये आमचा खर्च भागूनवर उरायचे पैसे मग त्यातूनच कुठेतरी जे जे मला मिळालं नाही ते ते सारं माझ्या मुलाला मिळालं पाहिजे या जिद्दीतून रेसमध्ये धावणा-या घोड्यासारखे पैसा तसेच प्रतिष्ठा या मागे माणसं धावत सुटली आहेत पण कुठेतरी जेव्हा जेव्हा थकलेला जीव निवांत बसतो आणि मागे भूतकाळाकडे वळून पहातो तेव्हा तेव्हा  अगदी माझ्या शब्दातच सांगायचे झाले तर ....
 ' देहाचा दीपस्तंभ ....
औदुंबराच्या  वठलेल्या  खोडाकडे....
पहाता पहाता....
कल्प विकल्पांच्या भारणीत..
गुंतून गेला .... '
असं काहीसं वाटतं रहातं.          
       आज छडी लागे छमछम ऐवजी मोबाईलवर केंद्रीत झालेल्या शिक्षण प्रणालीला पावकी निमकीचे पाढेचं येत नाहीत. प्रत्येक हिशेबाकरिता त्यांना कॅल्क्युलेटरकडे धाव घ्यावी लागते. आज बदलत्या समाज व्यवस्थेत वाढते वृध्दाश्रम तसेच पाळणाघरं हे माणसापासून माणूस दूर जात चालल्याचे चित्र अधिकाधिक स्पष्ट करत आहे.राजाराणीच्या संसारात मोठ्यांची होणारी अडगळ किंवा अगदी त्यांच्याच भाषेत बोलायचं झालं तर डस्ट बीन हा एक खूप मोठा विषय आहे.पण  नवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून स्वतःच जीवन समृद्ध करू पाहणाऱ्या  आणि तोंडातून शब्द बाहेर येण्या आधी सर्व सुविधा हजर केल्या म्हणजे झालं असं मानणा-या तसेच आजी आजोबा असून ही आपलं पिल्लू हे पाळणाघरात जास्त सुरक्षित आहे की आजी आजोबांकडे? याचा विचार ही करायला आजच्या पिढीला वेळ नाही. प्रायव्हसीच्या नावाखाली आजी आजोबांकडून तुप भात मेतकूट भरवत भरवत चिऊ काऊच्या, इसापनीतीच्या, बिरबलाच्या गोष्टींपासून ते थेट आकाशातील चंद्र ता-यांच्या माहिती पासुन ते जनमानसात हुषारीने कसं वावरायचं याचं व्यवहार ज्ञानापासून आजच बालपण दुरावलेलं आहे. दुर्दैवाने आजच्या पिढीला आजोळ किंवा माहेरपण  अनुभवण्याकरिता आजकाल सुट्टीत 'मामाच घर ' किंवा 'माहेर' या सारख्या रिसोर्टना जावं लागतंय या सारखं दुर्दैव नाही . कधीकाळी प्रेम माया ममता ही पैसे टाकून विकत मिळेल. हा ही एक व्यवसाय होईल असं स्वप्नात ही वाटलं नव्हतं. शिवाय घरात अत्यंत लाडाकोडात वाढल्यामुळे मुलांमध्ये हेकेखोरपणा वाढलाय ते वेगळचं . तसेच दुसरं भावंडं नसल्याने "मी'  "माझं' अशा भावना मनात भरून राहिल्या तर आहेतच शिवाय एक तीळ सात जणांना वाटून घेण्याची वृत्तीही संपत चालली आहे.शिवाय आजची तरूण पिढी देखील ' I want a spece '  असं म्हणून नोकरी, शिक्षण यांची कारण देऊन घरातून बाहेर पडायला लागली आहेत एकटी रहायला लागली आहेत.  पुर्वी,"पानात पडलेलं खातेस की मार खातेस ?" इतके दोनच पर्याय आमच्यासमोर होते पण आज स्वीगी , झोमॅटो वगैरे नी रात्री बेरात्री कधीही कुठेही वेगवेगळे पदार्थ पुरवून खाद्य संस्कृतीची पुर्ण वाट लावली आहे. आज शेंगोळे,उकड पेंडी , सुधारस , धपाटे , मांडे यासारखे पौष्टीक पदार्थ जेवणातून हद्दपार झाले आहेत.सध्या चायनीज पदार्थ हे तर सा-यांच्याच जेवणातील अविभाज्य भाग बनला आहे.पण त्यातील अजिनोमोटो हा आपल्या हाडांच्या सांध्यांमध्ये सरळ सरळ सिमेंट सारखा जाऊन बसतो मग परिणामी सांधेदुखी आणि पुढे जाऊन तो 'नी रिप्लेसमेंट' पर्यंत पोहचतो . थालीपीठ,दडपे पोहे या ऐवजी वेफर्स, समोसे,वडे ,भजी ,पाव एक नाही असे हजारो पदार्थ आहेत की जे आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना अनारोग्या कडे घेऊन जात आहे. 
       मोबाईल ही काळाची गरज आहे हे मान्य पण आपलं बाळ मोबाईलवर नक्की काय आणि कोणतं ज्ञान घेत आहे याकडे आपणच नको का लक्ष द्यायला? पण हल्लीच्या "तो की नाही, मोबाईल हातात दिल्याशिवाय जेवतच नाही" म्हणून मिरवणाऱ्या आजच्या माॅमना कोपरापासून साष्टांग दंडवतच घालावंस वाटतं. आज ही आपले जुने शिक्षक दिसले की हळूच पटकन शर्ट इन करणारी आमची पिढी आणि व्यसनाधीन होऊन स्वतःच्या सरांना सिगारेट ऑफर करणारी आजची तरूण पिढी यांच्यातील अंतर दिवसेंदिवस वाढत चाललंय त्याच मुळ कारण पुन्हा एकदा आपल्यातील आजीआजोबा नावाचा कोसळलेला पुल आहे असं मला वाटतं. अन्नाच्या असोत नाहीतर वागण्या बोलण्याच्या सा-या सा-या सवयी ह्या मुलं आपल्या आजूबाजूच्या परिसरातील वावरणाऱ्या व्यक्तींकडून घेतात मग ते आई वडिल असोत किंवा आणखी कोणी असोत . त्यामुळे त्यांचे संगोपन हे अत्यंत काळजीपूर्वक होणं गरजेचं आहे. स्वतःच्या अस्तित्वाचा डोलारा सांभाळत, स्वप्नांच्या सुंदर लोलकांतून, इंद्रधनुष्यी यशाची किरणं आपल्या इवल्या इवल्याशा पाखरांपर्यंत पोहोचायला हवी असतील तर , निरक्षीर विवेकाने पाश्चिमात्याच्या दिशेने धावणाऱ्या समाजाचा साधक बाधक विचार करून त्यातील वैद्यानीक तसेच जीवनाला उचित दिशा देणारे गुण वेचून अवगुणांचे काटे काढून त्यांना  ,सुविचारांच्या जीवनदायी फुलांच्या पायघड्या आपल्या मुलांच्या पायाशी घाला जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्या या सत्ता आणि संपत्ती यांचे उपासक न होता संयमीत, स्नेहाद्र होईल. तसेच चढाओढीच्या या दुनियेत जगत असताना ज्यांच्यासाठी तुम्ही हे सारं करताय त्या आपल्या बाळाकडे ही लक्ष द्या . कसं आहे ना की आयुष्य हे वाहत्या पाण्यासारखं आहे कितीही म्हटलं ना तरी आपण प्रवाहाबरोबर वाहून गेलेल्या पाण्याला जसा परत स्पर्श नाही करु शकत तसेच हे गेलेले क्षण तुम्ही पुन्हा नाही जगू शकणार, तेव्हा वेळीच मिळालेले ते अमुल्य क्षण आईबाप म्हणून जगा . ती छोटे छोटे आनंद मनाच्या कुपीत खोल खोल दडवून ठेवा कारण जशी औषधाला एक्सपायरी डेट असते ना तशीच या बालपणालाही असते. एकदा का ते एक्सपायर झालं ना की तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी ते परत येणार नाही. त्यामुळे आताच लहानपणीच तुम्ही तुमच्या मुलांना जे शिकवालं तीच त्यांची आयुष्यभराची पुंजी असेल हे लक्षात असू द्या.
      आपलं बाळ हे आपला आरसा असतं हे अगदी शंभर टक्के खरं आहे म्हणूनच आपलं प्रतिबिंब हे इतकं देखणं करा की सा-यांनी त्याला पाहून म्हटलं पाहिजे.....
 " प्रत्यक्षाहूनी प्रतिमा सुंदर...
  ज्योतीने तेजाची आरती.." 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...