मंगळवार, २३ मे, २०२३

350. नातू आणि आजोबांचे नाते...

 नातू : आजोबा नातू म्हणजे काय हो? 
आजोबा :  (जरा विचार करून)  नातू म्हणजे ना आजोबांच्या आयुष्यातील सगळ्यात शेवटचा बेस्ट फ्रेंड.  नातवा अगोदर खूप मित्र असतात पण नातवानंतर कोणीच बेस्ट फ्रेंड होत नाही. 
नातू : आजोबा, मग आजोबा म्हणजे काय हो? 
आजोबा : आजोबा म्हणजे नातवाच्या आयुष्यातला पहिला बेस्ट फ्रेंड जो शेवटच्या श्वासापर्यंत नातवाचा मित्रच असतो...
नातू :  मग आपण दोघं कोण? 
आजोबा : तू म्हणजे माझा संपत आलेला काळ आणि मी म्हणजे तुझी सुरुवात.

आज्याचे हात निबरलेले, नातवाला टोचत नाहीत.
केससुद्धा आधार देतात, माया काही संपत नाही. 

चष्म्या मधून रस्ता पहात, जपून आजा चालत राही.
मायेच्या या गाठोड्याला, जीवापरी जपत राही.

सरती पिढी वारसाला, डोक्यावर बसून घेई.
आपल्यापेक्षा मोठा हो, कृतीतून सांगत राही.

दुधापेक्षा साय मऊ, स्नेह तिथे गोळा होई.
क्षण क्षण आनंदाचा, जाता जाता जगून घेई .

एक नागडा दुसरा उघडा, कुणाला काही वाटत नाही
माया असते काळजात, तिथे कापडाची गरज नाही  

दोघांचही बालपणच, दोन टोकं जीवनाची.
भूपाळी ती एकाची नि भैरवी ती दुसऱ्याची. 

©️ सौ मेघना फडके 

२ टिप्पण्या:

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...