शनिवार, ३१ जानेवारी, २०२६

2524. योग जुळून यावा लागतो

     बाबा मॅरेज ब्युरोत तुम्ही माझं नाव नोंदवलं त्याला आता पांच वर्ष झालीत. अजून ना मी कोणाला पसंत पडली ना मला कोणी अजून हवं तसं मिळालं. अजूनही मला बघायला मुलं तर येत आहेत ना मग तुम्ही का एवढं टेन्शन घेता? योग जुळून येईल तेव्हा जमेल, असेल नशिबात लग्न तर होईल नाहीतर नाही. मला काही फरक पडणार नाही, नाही झालं तरी, पण बघायला येणाऱ्या मुलांना मी जे पाच प्रश्न विचारते. त्यांची मला अपेक्षित असलेली उत्तरं यायलाच हवीत, जो पर्यंत ते येणार नाहीत तो पर्यंत मी त्यांना नवरा म्हणून निवडणार नाही हे मी आधीही सांगितलं होतं तुम्हाला, आत्ताही सांगते आहे. तरी तुम्ही सांगत असता आजचा पस्तीसाव्वा झाला, चाळीसाव्वा झाला , तुम्ही मोजत बसू नका, मला पटेल त्याच्याशीच मी लग्न करीन नाहीतर अशीच राहीन लग्न न करता एकटी..! " 
"अगं बेटा तसं नाही, वाईट वाटून घेऊ नकोस पण तू ही थोडा विचार कर ना. तू गोरी, उंचपुरी, देखणी सुंदर असतीस तर एकवेळ एवढ्या अपेक्षा ठेवायला हरकत नव्हती पण तू देखणी नाहीस हे तुलाही माहितीये. गोरी नाहीस. तुझी हाईटही कमी आहे इनमिन पांच फूट. असं असतांना इतक्या अपेक्षा ठेवणं बरोबर नाही असं एक मला वाटतं. काहींनी तुला पाहूनच रिजेक्ट केलं आणि ज्यांनी पसंत केलं ल्यांना तू ही प्रश्न विचारून रिजेक्ट केलस..! आता वयाच्या पस्तीशीत आहेस तू , वय वाढेल तसे पुढे प्रॉब्लेम्स ही येतात लग्नानंतर..! " 
"म्हणजे तुम्ही म्हणताय की देखण्या नसणाऱ्या मुलींनी कुठल्याच अपेक्षा ठेवायला नकोत. मुलाकडून पसंती आली आणि तो ठिकठाक असला की लगेच हो म्हणून टाकावं असंच ना ..? माझ्या सारखीला माझा चॉईसच नसावा , बरा असेल तरी खूप झालं, हो म्हणून टाकावं हेच सुचवायचं आहे ना तुम्हाला..? अन् लग्नानंतर तशा मुलींना जर नवऱ्याच्या खटकणाऱ्या म्हणा किंवा न आवडणाऱ्या गोष्टी दिसू लागल्या अन् त्याचा स्वभावही आवडला नाही तर तिने काय करायचं, कोणाला सांगायचं ..? एकटीनेच सहन करत रहायचं चुपचाप , त्याबद्दल कोणाला  बोलायचं ही नाही , हो ना..? " 
" थोडं कॉम्प्रोमाइज करावंच लागतं भैरवी अशा गोष्टीं मधे , त्यात काही कमी पणा नाही सगळं आपल्याला हवं तसंच मिळेल असं फार क्वचित होतं..! " 
"नाही बाबा सॉरी, पण माझ्या प्रश्नांवर मी कधीच कॉम्प्रोमाइज करणार नाही .त्यावर त्यांची मला हवी असलेली योग्य उत्तरं आलेली दिसली तरच मी लग्नाचा विचार करीन नाहीतर नाही, एकटी राहीन मी. त्यात काय एवढं, मुलगी तिशीत येई पर्यंत तिचं लग्न झालंच पाहिजे नाहीतर समाजात बरं दिसणार नाही वगैरे अशा गोष्टीशी मला काही देणं घेणं नाही. अशा फालतू दडपणा खाली मी माझ्या आयुष्याचा ताबा कोणाच्याही हाती सोपवून माझं आयुष्य नेहमी साठी मला नको होतं तसं होऊ देणार नाही, ते मला हवं तसंच घडवायचं आहे बाबा मला..! "
***
भैरवी एक अतिशय हुशार आणि गुणी मुलगी होती. ती तिच्याच एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीची सी.इ.ओ. होती. वर्षाला चार करोड रुपये तिच्या बँक खात्यात जमा व्हायचे पण तिला तिच्या श्रीमंतीचा अजिबात अहंकार नव्हता. अगदी साधी रहाणी होती तिची. ती जी आहे ते तिच्याकडे बघून कोणाला वाटणार नाही. ती दाखवायचीही नाही तिचं मोठेपण..!
 कंपनीच्या कामा निमित्त किंवा काही ग्लोबल कॉन्फरन्सेस मुळे अधेमधे तिला आउट ऑफ इंडिया जावं लागायचं..!
एकदा असंच न्यूयॉर्कला जातांना फ्लाईट मधे तिच्या बाजूच्याच सीट वर जाड फ्रेमचा चष्मा घातलेला उंच म्हणता येणार नाही पण थोडा लठ्ठ असा काळा सावळा पण स्मार्ट, एक साधारण चाळीशीत असलेला एकजण येऊन बसला, प्लेन ने गेट सोडलं होतं पण सिग्नल नसल्याने थोडं पुढे येऊन थांबलं होतं..!
भैरवीच्या सीट समोरचा टीव्ही लागत नव्हता, टीव्ही , रिमोटशी तिनी बरीच खटपट करून पाहिली पण काही लागेना, बाजूला बसलेला तो सगळं बघत होता...
" मॅडम मी ट्राय करून पाहू का..? "
भैरवी ने हो नाही म्हणायच्या आत त्याने तिच्या जवळ असलेलं रिमोट घेऊन ते कुठलीतरी वायर जोडून दुरुस्त करून दिलं ...
" मी चिन्मय जोशी, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे, माझी स्वतः ची कंपनी आहे हिंजवडीत..! "
थोडा गपिष्ट असावा असं वाटलं..!
पिक्चर दिसायला लागलं पण कलर्ड न दिसता ब्लॅक अँड व्हाईट दिसत होतं. त्यातही ब्लॅक जास्त असल्याने हिरो हिरोईन सावळेच दिसत होते म्हणून तिने नकळत त्याच्याकडे बघितलं.
"तुम्हाला सावळे लोक आवडत नाहीत का ..? "
तिच्याकडेच बघत म्हणाला ...
"बघा ना खरं सौंदर्य सावळ्या लोकांमधेच खुलून दिसतं नाही का मॅडम ..? " 
मंद स्मितहास्य देऊन त्याने तिच्यावरून नजर हटवली ..! 
भैरवी ला अंगावर शहारे आल्याचं जाणवलं , तिने थोडं लाजत ..
"नाही नाही तसं काही नाही अन् दिसण्यात काय असतं. माणसाचं कर्तृत्व त्याला घडवत असतं, मोठं करतं, चेहरा पट्टी नाही ..! "
"अगदी मनातलं बोलतात मॅडम , मी ही त्याच मताचा आहे , बाय द वे न्यूयॉर्क मधे कुठे असता मॅडम..? "
" मी पुण्याची आहे. न्यूयॉर्कला माझ्या कंपनी च्या कामानिमित्त जात आहे..! " 
" हो का , अरे वा..! छान , मीही पुण्याचा. मलाही माझ्या कंपनीच्या कामासाठी न्यूयॉर्कला जावं लागतं दर दोन चार महिन्यांनी, मोठी कंपनी आहे माझी. डॉलर्स ने बिलिंग होतं त्यामुळे पैसा मुबलक येतो. सध्या एकटा असल्यामुळे सगळं जमतं. घरी आई आणि माझ्याहून लहान भाऊ असतो पण तो पॅराप्लेजिक आहे. आपल्या मनानी त्याला धड उठून बसताही येत नाही. दिवसभर बेड वर पडून असतो. त्याच्यासाठी म्हणून मी लग्नही नाही केलं अजून. मी नसलो की आईच बघते त्याला पण ती ही आता थकली आहे. चाललंय झालं आपलं कसतरी...! "
" ओह माय गॉड ..! "
" का..? काय झालं..? " 
" नाही काही नाही पण सहज वाटून गेलं आपल्या बऱ्याच गोष्टीत बरंच साम्य आहे. मीही जोशी, भैरवी जोशी , माझीही स्वतः ची कंपनी आहे. माझ्याहून लहान असलेला माझा लहान भाऊ पण अनफॉरच्यूनेटली पॅराप्लेजिक आहे. मी नसतांना वडील बघतात त्याचं सगळं..! मला पण त्याच्यासाठी लग्न करावसं वाटत नाही. वडील आहेत तोवर ठीक आहे. नंतर कसं काय करायचं हा प्रश्नच आहे..! " 
मधे जवळपास एक तास असाच गेला की जेव्हा दोघेही शांत होते ..! 
" मॅडम, तुम्हाला राग येणार नसेल , तुमची हरकत नसेल तर एक गोष्ट विचारू? तुम्हाला नाही आवडलं तर स्पष्ट सांगा, मी वाईट वाटून घेणार नाही .! "
भैरवीला तो नेमकं काय विचारणार आहे ह्याची कल्पना आली होती. त्या कल्पनेनेच पुन्हा एकदा तिला शहारून आलं ..!
"मॅडम तुम्हाला बघताक्षणीच मला तुम्ही आवडल्या होत्या. आपल्या बऱ्याच गोष्टीत साम्य ही बरंच आहे. आपले प्रॉब्लेम्स ही सारखेच आहेत. आपण दोघे मिळून एकमेकांच्या मदतीनेते व्यवस्थित हॅण्डल करु शकू असा मला विश्वास आहे फक्त त्यासाठी तुम्ही तयार आहात का हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे मला ..! "
भैरवीला तिच्या मनात असलेल्या पाचही प्रश्नांची उत्तरे त्याच्याकडून न विचारताच मिळून गेली असल्याने ती मनोमनी खुश होती ..! लाजून त्याच्याकडे न बघताच ती थरथरत्या आवाजात हळूच बोलली ..
"हो मी तयार आहे ..! "
तिने बाबांना फोन करून सांगितले.
" बाबा , मला हवा होता तसा जोडीदार मिळालाय, फ्लाईट मधे आहोत , आल्यावर सविस्तर बोलू ..! " 
दोघांनीही एकमेकांकडे बघत हात मिळवले अन तेवढ्यात टाळ्यांचा कडकडाट झाला. दोघेही आश्चर्याने बघू लागले. एअर होस्टेस चा बर्थडे होता..!
तिकडे प्लेनचा ही मार्ग मोकळा झाला होता. हवा असलेला सिग्नल त्यालाही मिळाला आणि रनवे वर तुफान वेग घेत उंच आकाशात त्याने झेप घेतली..!

 संजय जहागिरदार .     ✍️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...