समिरा माळकर. वय वर्ष एकोणतीस. पदवीधर आणि विवाहित. दिसायला सुरेख. कुणालाही आवडेल अशी. लग्नाला तीन वर्ष झाली. तशी संसारात सुखीच पण मुळात लग्नच मनाविरुद्ध झालं. दिनेशचं स्थळ सांगून आलं, तेव्हा फोटो बघूनच ती नाही म्हणाली. पण दादानं ग्वाही दिली, “फार चांगला मुलगा आहे. मी बरीच वर्षं त्याला ओळखतो. दिसण्यावर जाऊ नकोस. अंगानं जरा भरला की बघ कसा दिसेल.”
तिनं दिनेशचा विचार केला नाही; आपल्या घराचा विचार केला. बाबा हार्ट पेशंट, आई थकलेली. त्या तिघी बहिणी. दादानं जिद्द धरली म्हणून तिघींची शिक्षणं झाली. तरी धाकटी अजून शिकतेच आहे. आपलं लग्न वेळेत झालं तर मधलीचं वेळेत बघता येईल. धाकटीच्या लग्नाला तसा वेळ असला, तरी आमच्या दोघींची लग्न झाल्यावर आई दादाच्या लग्नाचा विचार करेल. त्याचंही वय उलटत चाललंय आणि घाईघाईनं उरकायचं, म्हणून काही दादा आम्हाला कुणाच्या ही गळ्यात बांधणार नाही, हा विश्वास तिघी बहिणींना होता म्हणून सगळा विचार करून समिरा बोहल्यावर चढली.
सासरचं फार कुणी नव्हतंच. सासरे नुकते वारले होते आणि सासूबाईंनी खूप आधी आजाराला कंटाळून आत्महत्या केली होती. तेव्हा दिनेश खूप लहान होता. तो बाबांच्याच शिस्तीत वाढला. शिक्षण, नोकरी, संस्कार सगळं चांगलं होतं… फक्त आवडून जावा असा तो नव्हता, म्हणजे नाही.
तरी ती संसारात रमायचा प्रयत्न करायची… पण दिनेशचं वागणं काहीसं गोंधळात टाकणारं होतं. म्हणजे ही म्हणते, “आमच्या घरची परिस्थिती सामान्य, दादा एकटा कमावता तरी दादानं-आईनं आमच्या हौशी जपल्या. झेपतील तेवढे लाड केले. मतं मांडायला मोकळीक दिली. आमच्या मतांचा आदर केला.
“आताही मी नाहीच म्हणाले असते, तर दादानं फोर्स केला नसता; उलट आईला समजावलं असतं, ‘जाऊ दे! नको म्हणते, तर राहू दे. लग्नासारखी गोष्ट अशी जबरदस्तीनं लादण्यात अर्थ नाही.’”
पण समीरानं दादाचा विचार केला. त्यानं कुणाला सांगितलं नव्हतं; पण कॉलेजमधे असल्यापासून त्याचं जमलेलं होतं.
निव्वळ घरची जबाबदारी तो नाकारत नव्हता. म्हणून स्मितानं समंजसपणे निर्णय घेतला. फक्त तो आता निभावून नेणं गरजेचं होतं, नाहीतर अशा अस्थिर वृत्तीनं भेदरलेल्या माणसासोबत संसार करणं सोडा, वावरणंही कठीण होतं.
लग्न नवीन असताना, रंगात आलेलं असताना तो बावचळायचा. कधी अंमळ अंथरूणात पंधरा मिनिटं जास्त निजला, तर भेदरून जायचा. स्वतःचे कपडे स्वतः धुवायचा पण कधी ते वेळेत वाळले नाहीत, तर असा अस्वस्थ व्हायचा. आणि सगळ्यात कठीण आणि अगम्य गोष्ट म्हणजे त्याला घरातली केरसुणी कायम नवी आणि भरगच्चच लागायची ! हिच्या घरी नाईलाजानं असेल पण केरसुणीतल्या शेवटच्या पाच काड्या राहिल्या की नवीन केरसुणी आणायची चर्चा व्हायची आणि तीन काड्या उरल्या की नवी आणली जायची.
या विरूद्ध हा. केरसुणी आणून पंधरवडा नाही झाला की येताना नवी केरसुणी घेऊन हजर ! घरच्या कामवालीची भर. ती काय, जवळ जवळ नवी केरसुणी मजेत घेऊन जायची.
या वरून एक दोनदा वादही झाले… पण तो हट्टालाच पेटायचा. पण या वेळी हिनंच जरा ताणून धरलं. ऑफिसच्या व्यापामुळं दिनेशला घरी यायला उशीर व्हायचा. त्यामुळं दिनेशनं हिला केरसुणी आणायला सांगितलं. ती ‘हो हो’ म्हणत राहिली.
पण झालं काय, तेव्हाच मधलीचं लग्न ठरलं. हिच्या लग्नाला तीन वर्षं होत आली होती. म्हणजे आईच्या मते ही अनुभवीच बाई होती. मग काय आईच्या मदतीला हिच्या माहेरच्या फेऱ्या वाढल्या… त्यात साखरपुडा ठरला. मग तर बघायलाच नको. त्यात हिच्याकडून नवीन केरसुणी आणायची राहून जात होती. त्यात मुख्य काय, समिराला ते एवढं आवश्यक वाटत नव्हतं.
पण त्याचा परिणाम असा झाला की, एकदा येताना हा एकदम एकावेळी सहा केरसुण्या घेऊन आला. म्हणाला, “थोडे दिवस तुझे घाई गडबडीचे असतील, नवीन केरसुणी आणायची राहून जायला नको!”
मग भांडण पेटलं. झाडूशिवाय तिला खरं तर ह्याला झाडायचं होतं… पण भांडणही याला जमत नाही. त्या धुमसत्या वातावरणात ती साखरपुड्यासाठी आधी येऊन रहायला नाही म्हणत होती; ती तीन दिवस आधी आली. आईलाही बरं वाटलं. बहिणीही खूष झाल्या.
त्यात रितीनुसार मधलीच्या सासूबाई नात्यातल्या चार बायका घेऊन सुनेच्या माहेरी साखर भेट द्यायला आल्या. त्यांच्या घरची तशी रीत होती. स्वागताला आईसोबत समिरा होतीच. मुलीच्या सासूबाई आल्या. सगळं त्या सांगतील तसं पार पडलं आणि चहा घेताना त्या हिला म्हणाल्या,
“तू आमच्या दिनेश माळकरची बायको ना? नशीब काढलंस होऽऽ…! लाखात एक आहे मुलगा. मला मुलगी असती, तर जावईच करून घेतला असता!”
मती कुंठीत होणं म्हणतात, तसं हिचं झालं. सासूबाई बोलतच होत्या… “माझा लाडका विद्यार्थी आहे तो. आठवी-नववी मीच त्याची वर्गशिक्षिका होते. बापाच्या भितीनं सदैव धास्तावलेला असायचा. याचा एक मोठा भाऊ पण होता… तो लहानपणीच घरातून बापाच्या भितीनं पळून गेला; तो परत आलाच नाही.
“आईनं गळफास लावून घेतला आणि हे कोवळं पोर त्या खविसाच्या तावडीत सापडलं. झडलेल्या केरसुणीनं वाट्टेल तसा तो तावडीत सापडलेल्या मुलाला मारायचा. बघावं तेव्हा घराच्या कोपऱ्यात झडत चाललेली केरसुणी ठेवलेलीच असायची. कारण काही असो… आधी केरसुणी हातात घेणार.
“एकदा मार चुकवताना दिनेशच्या डोळ्याखाली जखम झाली. जेमतेम डोळा वाचला. हा काही बोलला नाही पण शेजाऱ्यांनी झाला प्रकार मला सांगितला. तश्शीच उठले आणि पोलिस घेऊन त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचले…
“मी एकटी नव्हते, चार शिक्षक होते सोबत. तमाशा करायचा ठरवलंच होतं तसा केला. बापाला पळता भुई थोडी झाली. पोलीसांनी उत्तम कारवाई केली. सुतासारखा सरळ आणला.
“पण म्हणावा तसा दिनू खुललाच नाही. त्या वर्षी परीक्षा होईपर्यंत तीन महिने मी त्याला माझ्याकडेच घेऊन गेले. बाप गयावया करत आला होता, पण म्हटलं परीक्षा झाल्यानंतर पाठवेन…
“पोलिसांची करडी नजर होती. मुलाला घरी नेल्यास दर महिन्याला वैद्यकीय अहवाल जमा करायची अट घातली. त्याशिवाय दिनूला नेता येणार नाही म्हणून बजावलं.
“तिथं तो हेकेखोर इसम ढेपाळला. पण दिनूवरही त्याचा फार परीणाम झाला…”
म्हणून केरसुणीच्या बाबतीत तो आग्रही झाला होता. झडलेली केरसुणी त्याला डोळ्यासमोर नको असेल, पण नेमकी तीच त्याच्या डोळ्यासमोरून जात नसेल.
समिरासमोर अचानक सगळा उलगडा झाला. रडून आक्रोश करायचा असताना ती थरथरत उभी राहिली. रहायला आलेली माहेरवाशीण तातडीनं घरी जायला निघाली.
काय झालं हे जसं समिरा कुणाला सांगू शकत नव्हती, तसं ही घरी गेल्यावर काय होईल? काय घडेल? हे मी तुम्हाला सांगू शकत नाही… तुम्हीच समजून घ्या…!
— चंद्रशेखर गोखले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा