"अमानत" नावाची लेखमाला लिहून काही दिवसच नाही झाले अन् काल अचानक मेसेंजरवर एक मेसेज आला. पाठवण्याऱ्याचे नांव माझ्या बिलकुल परिचयाचे नव्हते कारण ती व्यक्ती नावावरून ख्रिश्चन होती. मेसेज असा होता.
रोझी डिसुझा. मी लहानपणापासून कोकणवासी असल्याने मराठी चांगले येते मला. आम्ही फक्त नावाचे ख्रिचन राहिलो. बाकी सगळे व्यवहार मराठी असल्यासारखे करतो आम्ही. तुमच्या अमानत नावाच्या कथेचे बरेचसे भाग मी आमच्या व्हाॅट्स एप ग्रुपमध्ये वाचले आणि माझं मन खुप वर्षे मागे गेले.
तुमच्या कथेतील अस्लम सारखा माझा एक छोटा भाऊ आहे टोनी. अभ्यासात गोडी नसल्याने खुप मागे पडल्यामुळे शिक्षण अर्धवट झाले. गावात तो फक्त उनाडक्या करायचा, वाईट गोष्टी करायचा. शेवटी माझ्या बाबांनी त्याला घराबाहेर काढले. ह्या गोष्टीला आता ३०-२५ वर्ष होऊन गेली असतील. वयोमानानुसार टोनीने एव्हाना पन्नाशी पार केली असणार. मुंबईत तो रहातो म्हणे. गावात लहानाचे मोठे होऊन नोकरी धंद्यासाठी मुंबई मध्ये रहाणाऱ्या आमच्या काही लोकांना तो मुंबईत भेटला. तिथे राहून म्हणे रात्रशाळेत शिकून तो मोठा झाला. चांगली नोकरी आहे त्याला. चार माणसांचे कुटुंब आहे त्याचे. वांद्रे भागात रहातो तो.
गेल्या वर्षी मला त्याचा मोबाईल नंबर मिळाला आणि त्याने गाव सोडल्यानंतर पहिल्यांदाच मी त्याच्याशी बोलले. झालं गेलं विसरून जाऊन त्याने एकदा तरी गावाला यावं आम्हाला भेटायला म्हणून मी त्याला मनांपासून विनंती केली होती. आम्हाला म्हणजे मला, माझ्या कुटुंबाला आणि आमच्या आईला जिला आम्ही माय म्हणतो. माझे वडील त्याला न भेटताच ख्रिस्तवासी झाले. पण इतक्या विनवण्या करून देखील गेले वर्षभर तो आला नाही.
पण तुमची अमानत कथामाला मी वाचली आणि अचानकपणे एक धाडसी विचार मनांत आला. त्या कथामालेतील शेवटचे तीन भाग मी त्याला व्हाॅट्स ऍपवर पाठवले आणि चमत्कार झाला. ते सगळं वाचून टोनी भावनाविवश झाला आणि मला ताबडतोब फोन करून म्हणाला रोझी मी नवीन वर्षाच्या स्वागताला कोकणात येतोय आपल्या घरी. मायला सांग माझ्या आवडीचे गोडधोड पदार्थ करायला.
टोनी येणार आहे हे ऐकून माझ्या मायच्या उत्साहाला तर उधाण आलं होतं. कामगारांना नीट सुचना देऊन तिने तिचे संबंध घर रोषणाईने डोळे दिपवणारं केले होते . काल मायच्या घरी केलेली रोषणाई बघून गावातील लोकांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली. जो तो एक दुसऱ्याला ह्याबाबत विचारत होता. बाबा गेल्यानंतर ह्या वर्षी पहिल्यांदाच नाताळच्या दिवसांत आमच्या घराने जुने दिवस बघितले नव्याने. रोषणाईने नटलेल्या आमच्या घराचे फोटो मी टोनीला पाठवले आणि ते बघून त्याने लगोलग मला फोन केला. खुप भावनाविवश झाला होता तो. इतके दिवस घरापासून लांब राहिल्याचा पश्चात्ताप त्याच्या बोलण्यातून सतत जाणवत होता मला. माझे डोळे सुद्धा भरून आले त्याचं बोलणं ऐकून. मी रडताना बघून फिलिप म्हणजे माझ्या नवऱ्याला देखील कसलाच उलगडा होत नव्हता. आमचं बोलणं झाल्यावर मी त्याला सगळं सांगितलं आणि तो मला म्हणाला रोझी ज्या दिवसाची तु आणि तुझ्या मायने वाट बघितली तो दिवस अखेर हाकेच्या अंतरावर येऊन उभा राहिला आहे. अमानत गोष्ट ज्या कोणी लिहिली आहे तो माणूस जणू काही 🎅 बनून आला आहे तुमच्या दोघींच्या आयुष्यात. टोनीच्या प्रत्यक्ष भेटीची गिफ्ट तो 🎅 तुम्हा दोघींना देऊन गेला आहे. ह्या वर्षीचा ख्रिसमस खरंच अनोखा आणि अविस्मरणीय ठरलाय.
आता आम्ही फक्त वाट बघतोय ३० तारखेची जेव्हा टोनीच्या रुपातील ⭐ आमच्या घरापाशी येऊन थांबेल आणि दार वाजवून मायला साद घालून म्हणेल माय ओ माय बघ कोण आलंय तुझ्या दारात.
टोनीला बघून मायच्या डोळ्यांत येणारे भाव आणि आनंदाश्रू बघायला मी आतूर झाले आहे.
माझ्या नवऱ्याने म्हणजे फिलिपने सुचवल्याप्रमाणे आपली ओळख नसताना देखील मी जमेल तसे तुम्हाला लिहून पाठवले आहे.
थॅंक्यु 🎅 फाॅर धीस वंडरफुल गिफ्ट. आमची अमानत तुम्ही अप्रत्यक्षपणे आम्हाला परत केली आहे. गाॅड ब्लेस यु ऑल्वेज.
© सतीश बर्वे
२६.१२.२५
टीप: मेसेंजर आलेला मेसेज वाचल्यावर मला आश्चर्याचा धक्काच बसला आणि त्या NGO च्या देवदुताचे मी परत एकदा आभार मानले मनांतल्या मनांत. कारण त्याच्या हातून घडलेलं पुण्य काम माझ्या ऐकण्यात आलं होतं ज्यावर आधारित होती माझी "अमानत" ही कथामाला. रोझीचा मूळ मेसेज मात्र त्रोटक होता. पण त्यातला खरा घटनाक्रम डोळ्यांसमोर ठेवून मी ही कथा लिहिली आहे. माझ्या लिखाणातून नकळत एक चांगली गोष्ट घडून एका घरातील दुरावलेली माणसं उशिरा का होईना पण एकत्र येत आहेत ही खरोखरच आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे माझ्यासाठी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा