शनिवार, ३१ जानेवारी, २०२६

2515. बाळा , गाऊ कशी अंगाई

 देवघरात देवासमोर तेवणाऱ्या समईच्या ज्योतीसारखा तिचा शांत , सात्विक चेहरा याक्षणी चिंताग्रस्त दिसत होता. ती माझ्यासमोर बसली होती तरी पाळण्यात झोपलेल्या तिच्या बाळाच्या आठवणीने तिचे डोळे सारखे भरुन येत होते. त्याच्या भवितव्याच्या काळजी तिला भेडसावत होती. त्याला कारणही तसेच होते. 
साधारण सहा वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले होते. लग्नानंतर तिच्या पतीने उपजीविकेसाठी एक छोटासा डायनिंग हाॅल टाकला होता. त्या डायनिंग हाॅलचे किचन सांभाळण्याची सर्वात महत्त्वाची जबाबदारी त्याने स्वतःच्या पत्नीवर म्हणजेच तिच्यावर टाकली होती. कोणतंही हाॅटेल किंवा डायनिंग हाॅल त्याच्या फर्निचर , सजावट , थाटावरुन ओळखला जात नसतो. डायनिंग हाॅल हा तेथे मिळणाऱ्या जेवणाच्या चवीवरुन ओळखला जात असतो. ही गृहिणी तर साक्षात अन्नपूर्णा होती. तिने स्वयंपाकासाठी काही महिला ठेवल्या. त्यांना ती सूचना देत असे. प्रत्येक भाजी , चटणी , कोशिंबीर कशी बनवायची , त्यात तिखट , मीठ , मसाले किती आणि कसे टाकायचे हे ती स्वतः किचनमध्ये उभी राहून त्या मदतनीस महिलांना सांगत असे. तिचे मसाल्यांचे ज्ञान केवळ अफलातून होते. त्यामुळे त्या डायनिंग हाॅलची ख्याती लवकरच दूरदूरपर्यंत पसरली. 
मग गिऱ्हाईकांना बसण्यासाठी जागा अपुरी पडायला लागली. म्हणून त्या दांपत्याने बॅंक लोन काढून खूप मोठा डायनिंग हाॅल सुरु केला. तोही जोरात चालू लागला. 
अशा सुखी संसारात रममाण असलेल्या त्या अन्नपूर्णेला एक दिवस बाळंतपणाची चाहूल लागली. त्यांच्या सुखी संसाराच्या वेलीवर लवकरच एक टवटवीत नवे फूल उमलणार होते. तरीही डायनिंग हाॅलच्या जेवणाची चव बिघडू नये म्हणून ती पोटातील बाळाचं ओझं सहन करत किचनमध्ये उभी राहायची. शेवटी डॉक्टरांनी तिला आराम करण्याची सक्त ताकीद दिल्यावर ती माहेरी गेली.
ती माहेरी गेल्यावर काही दिवसांतच इकडे नाट्यमय घडामोडी सुरु झाल्या. त्याच परिसरात राहणाऱ्या एका सुंदर पण अनैतिक वर्तणूक असलेल्या महिलेने ती माहेरी गेल्याची संधी साधून तिच्या स्खलनशील नवऱ्याला जाळ्यात ओढले. कित्येक दिवसांपासून तिचा त्याच्या पैशांवर डोळा होता. तिचा नवरासुद्धा त्याच्या पत्नीचे त्याच्यावर असलेले निरतिशय प्रेम विसरुन त्या स्त्रीच्या नादी लागला. तो इतका खुळावला की त्याने चक्क तिला स्वतःच्या घरात आणून ठेवले.
त्याची पत्नी बाळंत होऊन तिला मुलगा झाला. त्याला घेऊन ती स्वतःच्या घरी आली तेव्हा तिथे दुसरीच स्त्री पाहून तिला जबरदस्त धक्का बसला. तिने तिच्या नवऱ्याला जाब विचारल्यावर तो निर्लज्जपणाने तिला म्हणाला की तिला घरात राहायचे असेल तर त्या दुसऱ्या स्त्रीसोबत राहावे लागेल अन्यथा तिला तिचा मार्ग मोकळा आहे. हे ऐकल्यावर त्या अन्नपूर्णेला अश्रू अनावर झाले. पण ती स्वाभिमानी स्त्री तिच्या तान्ह्या बाळाला घेऊन तडक माघारी फिरली.
ती तिच्या आईकडे परत आली तरी ती आईवर ओझं होऊन राहिली नाही. तिने तशाही अवस्थेत टिफीन सर्व्हिस सुरु केली. तिच्या बाळाच्या भवितव्यासाठी ती कितीही कष्ट उपसायला तयार होती. त्या काळात तिला कुणीतरी माझे नाव सुचवले. तिच्या आईकडे त्या दोघा पतीपत्नीच्या जन्मपत्रिका होत्या. त्या घेऊन ती माझ्याकडे आली होती. 
मी दोन्ही पत्रिकांचा बारकाईने अभ्यास केला. तिच्या चतुर्थ स्थानात राहूचे गोचर भ्रमण सुरु असल्याने तिचे हक्काचे घर तिला दुरावले होते. अर्थात आणखी वर्षभरात राहू त्याचा मुक्काम हलवणार होता. त्यामुळे एका वर्षाने ती परत तिच्या हक्काच्या  घरात जायची शक्यता होती. तिच्या नवऱ्यावर मात्र काही दिवसांतच शनिचा अंमल सुरु होणार होता. त्याने केलेल्या प्रत्येक वाईट कर्माचे पुरेपूर माप न्यायदेवता असलेला शनि त्याच्या पदरात टाकणार होता.
मी तिला समजावून सांगितले , " तू अजून वर्षभर धीर धरावास असं मला वाटतं. तू तुझं काम चालू ठेव. तुला परत तुझ्या घरी जायची संधी येऊ शकते. पण तसा प्रस्ताव आल्यावर तू डायनिंग हाॅल तुझ्या बाळाच्या नावे करुन देण्याची अट घाल. तसेच तो सज्ञान होईपर्यंत डायनिंग हाॅलचे व्यवहाराचे हक्क तुझ्याकडे असतील अशी तरतूद करुन ठेव. या कामासाठी तू चांगल्या वकीलाची मदत घे. "
ती मोठी धीराची होती. तिने खंबीरपणे तिचा टिफीन सर्व्हिसचा व्यवसाय करत शांतपणे वाट पहाण्याचं ठरवलं.
या प्रसंगाला दहा - बारा वर्षे लोटली.
रोजच्या कामाच्या रहाटगाडग्यात मी हा प्रसंग साफ विसरुन गेलो होतो.
एक दिवस मी शहरातील एका श्रीमंत वसाहतीतून काही कामानिमित्त चाललो होतो. तेव्हा अचानक एका बंगल्यातून एक वाॅचमन पळत आला.  मला त्या बंगल्याच्या मालकिणीने बोलावले होते. मी मनाशी आश्चर्य व्यक्त करत आत गेलो.
आत आलिशान सोफ्यावर तीच बसली होती........  तीच अन्नपूर्णा. 
तिने उठून मला नमस्कार केला व थोडक्यात तिची हकीकत सांगितली , 
" ती मला भेटून गेल्यानंतर अपेक्षेप्रमाणे तिच्या नवऱ्याचे ग्रह फिरले होते. घरच्या लक्ष्मीला बाहेर काढून बाहेरची अवदसा घरात आणणाऱ्या माणसाचं कधी भलं होत नसतं. 
अन्नपूर्णा बराच काळ गैरहजर असल्याने डायनिंग हाॅलच्या जेवणाची चव पूर्वीसारखी राहिली नव्हती. त्यामुळे गिऱ्हाईक मोठ्या प्रमाणावर कमी झालं होतं. कर्जाचे हप्ते थकत चालले होते. डायनिंग हाॅलच्या स्टाफला पगार देणं मुश्किल झालं होतं. ती दुसरी सुंदर स्त्री तिच्या नवऱ्याकडून भरपूर पैसा उकळून त्याला कायमचा सोडून गेली. मग असं संपूर्ण एकाकी पडल्यावर त्याला बायको आठवली. तो पत्नीला परत न्यायला आल्यावर तिने ठरल्याप्रमाणे  ती अट घातली. ती त्याला मान्य करावीच लागली कारण ती आली नसतो तर डायनिंग हाॅल पूर्ववत चालला नसता.
मग वकीलाने सर्व कागदपत्रे व्यवस्थित तयार करुन दिल्यावर ती अन्नपूर्णा पुन्हा पदर खोचून उभी राहिली. आता ती तिच्या बाळासाठी जिवाचं रान करणार होती. प्रचंड मेहनत करुन तिने डायनिंग हाॅल पुन्हा नावारुपाला आणला आणि आज ती अतिशय सुखात होती. "
तिची हकीकत ऐकून मला खूप आनंद झाला.
तिने तिच्या बाळासाठी अंगाई गीत गायले होते.  पण तिचे अंगाई गीत हे तिच्या जिवापाड कष्टाचे होते  , तिच्या असीम धैर्याचे होते. 
मग तिच्याशी काहीवेळ बोलून मी समाधानाने तिथून निघालो. 

जितेंद्र अभ्यंकर 
8605396156

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...