"रात्रीचे दहा वाजून गेले आहेत.. स्वाती सुरेशचं भांडण आज अगदी टिपेला गेलेलं दिसतयं.. थांबायचं नावच घेत नाहीय.." केशरकाकूनी अरूणरावांच्या हातात 'इन्सुलीन'ची सुई देत म्हटलं.
आणि त्यांच वाक्य अजून संपत नाही इतक्यात त्यांच्या डोअरवरची रिंग वाजली.
"बहुतेक स्वातीच आली असणार..मी सांगते तुम्हाला !" केशरकाकूनी दार उघडत म्हटलं.
स्वाती सुरेशचा प्रॉब्लेम त्यांना माहित होता. सहा महिन्यापासून सुरेश रात्री कंपनीतून उशीरा यायला
लागला होता आणि नवऱ्यावर मनस्वी प्रेम करणाऱ्या स्वातीला अलिकडे
'वेगळाच' संशय यायला लागला होता. आणि मग त्यातून बहुतेक रोज रात्री दोघांची भांडण ठरलेली असायची.
स्वाती हातात बॅग घेऊन उभी होती. "काकू..मी सुरेशचं घर सोडून चाललेय कधीही परत न येण्यासाठी ! "
केशरकाकूनी तिला घरात घेतलं आणि आपल्याजवळ बसवून अर्धा तास तिची मायेनं समजूत काढली.
"हे बघ स्वाती सुरेश रोज उशीरा घरी येतो हा तुझा प्रॉब्लेम आहे ना ? एक काम कर. तो इंजिनिअर आहे आणि तो ज्या कंपनीत जॉब करतो तेथे दोन शिफ्ट असतात. तू त्याला शिफ्ट बदलून घ्यायला सांग.आणि दुसरी शिफ्ट रात्री उशीरा सुटत असल्यामुळे त्याला कंपनीच्या बसनंच याव लागेल आणि बस ठराविक वेळेत निघत असल्यामुळे
लवकर उशीराचा प्रश्नचं येणार नाही. आणि मी सकाळी सुरेशलाही हे समजावून सांगते. तो ऐकेल माझं..!
स्वातीचे डोळे चमकले. हे तिच्या आजपर्यंत लक्षात आलच नव्हतं !
आणि केशरकाकूनी त्या दोघातला एका छोट्या कारणांमुळे गंभीर झालेला तो प्रॉब्लेम अशा हळुवार पद्धतीनं सोडवला होता !
सोसायटीतील कोणत्याही घरात काहींही वाद झाले, नवराबायकोची भांडण झाली की त्यात केशरकाकूंनी मध्यस्थी ठरलेली असायची. अरूणराव तर कधी कधी त्यांना चेष्टेत 'मॅरेज सेटलमेंट कोर्ट ' म्हणायचे ! अशा या प्रत्येकाच्या संसारिक अडचणीला धाऊन जाणाऱ्या, लहानमोठ्या कारणानं एकमेकांपासून दुरावणारया पतिपत्नींमधील तेढ कमी करण्यासाठी धडपडणारया आनंदमुर्ती केशरकाकूच्या जीवनात पहिला आघात त्याच कारणांमुळे झाला होता. त्यांच्या या आनंदवृत्तीला, या वागण्याला एक दु:खाची, वेदनेची किनार होती आणि त्या एका घटनेमुळं मनस्वी स्वभावाच्या केशरकाकूंचं आयुष्य बदलून गेलं होतं.
सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या त्यांच्या एकुलत्या एक मुलानं, वरूणनं एका अतिश्रीमंत वडिलांच्या लाडावलेल्या मुलीशी प्रेमविवाह केला होता. अरूणरावांनी त्यातले धोके समजावून सांगूनही त्यानं हट्टानं जुहीशी लग्न केलं होतं आणि जे व्हायचं तेच झालं होतं. तिच्या म्हणण्याप्रमाणे एखादा पॉश बंगला घेण्याऐवजी वरूणनं सोसायटीतील थ्री बी एच के विकत घेतला या एका छोट्याशा कारणावरून ती घर सोडून निघून गेली होती आणि पुढे तिनं घटस्फोटासाठी अर्ज दिला होता. केशरकाकू आणि अरूणरावांनी परोपरीनं समजावून सांगूनही ती परत आली नव्हती आणि या धक्क्यातून न सावरलेला वरूण यु एसला निघून गेला होता आणि वरूणनं आपल्या बायकोसाठी घेतलेल्या त्या फ्लॅटमध्ये केशरकाकू आणि अरूणरावांना एकट राहण्याची वेळ आली होती.
आणि मग केशरकाकूंनी सोसायटीतील प्रत्येक कुटुंबातल्या तरूण पतिपत्नींमध्ये आपल्या लाडक्या मुलाचा संसार पहायला सुरवात केली होती. त्यांच्या सुखदुःखात, त्यांच्यात होणारे लहानमोठे संसारिक वाद, भांडण मिटवण्यासाठी त्या प्रयत्न करायला लागल्या होत्या आणि त्या सगळ्या सोसायटीतील कुटुंबाच्या लाडक्या केशरकाकू झाल्या होत्या.
पण नियतीला त्यांच हे असं सगळ्यांच्या संसारात आनंद निर्माण करणं .. त्यांना सुखाचा, एकमेकांना समजून घेण्याचा मार्ग दाखवणं आणि त्यातच आपला आनंद मानणं मान्य नव्हतं आणि तिनं केशरकाकूंवर आता आणखी एक आघात केला होता !
अशा या सबंध सोसायटीसाठी मायमाऊली असलेल्या केशरकाकू यावेळी मात्र कोलमडून गेल्या होत्या. दुसर्यांचे संसार पुन्हा उभे करणाऱ्या,परत प्रेमाच्या मार्गावर आणणार्या केशरकाकूंच्या प्राणप्रिय अरूणरावांचे दोन्ही डोळे, 'एक्यूट डायबेटिस'मुळे निकामी झाले होते.. ते दृष्टीहीन झाले होते ! मुलाच्या दु:खातून सावरण्यासाठी दुसऱ्याच्या सुखात आनंद मानणार्या केशरकाकूंना अंधत्वामुळं आलेल्या अरूणरावांच्या वेदना पावलोपावली जाणवत होत्या. सतावत होत्या. अख्ख्या सोसायटीला संकटाच्यावेळी धीर देणाऱ्या, अनेक तुटायला आलेले संसार सावरणारया केशरकाकू आपल्या प्राणप्रिय पतीवर झालेल्या या आघातानं उध्वस्त झाल्या होत्या.. विदीर्ण झाल्या होत्या ! त्यांच्या चेहऱ्यावरचं आनंदी निर्मळ हास्य आता मावळलं होतं. आता त्या कुणाशी फारशा मिसळत नव्हत्या. कुणी भेटायला घरी गेलं तरी त्यांना टाळत होत्या आणि त्यादिवशी ते अघटित घडलं होतं..!!
सोसायटीत सकाळपासून उत्साहाचं आणि धावपळीचं वातावरण होतं. निवडणूका जवळ आल्यामुळे कुठल्या तरी 'युवा नेत्यानं' सोसायटीत "मोफत नेत्र तपासणी शिबीर " आयोजित केलं होत आणि त्याची तयारी चालू होती..!
दोन दिवसापूर्वीचं चेअरमननी सोसायटीच्या गृपवर नेत्रशिबिराचा मेसेज टाकलेला होता. शिबीर मोफत असल्यामुळे आणि स्थानिक टीव्ही चॅनेलसाठी शुटींग होणार आहे असं जाहीर करण्यात आल्यामुळे सोसायटीचा हॉल भरुन गेला होता आणि जवळ जवळ दोन वर्षानंतर सोसायटीत होणारा हा पहिलाच सार्वजनिक 'कार्यक्रम' असल्यामुळे सोसायटीतील महिलांचा उत्साह अवर्णनीय होता.
सोसायटीमधल्या "ब्युटीफूल वुमन" ह्या लेडीज गृपनं कालच 'ऑनलाईन ' मिटींग घेऊन आजचा कार्यक्रम
'हेल्थ'शी संबंधित असल्यामुळे व्हाईट ड्रेसकोड फायनल केला होता..!त्यामुळं हॉलमध्ये पसरलेला पांढरा रंग बघून डॉक्टरांनी येताना हॉस्पिटलमधल्या सगळ्या 'सिस्टर' इकडेच आणल्या की काय असं वाटायला लागलं होतं..!
पण शिबिरासाठी जमलेल्या सगळ्यांनाच औत्सुक्य आणि आतुरता होती केशरकाकूच्या येण्याची..!
आणि कालच चेअरमनना फोन करून शिबीरासाठी आपलं नाव नोंदवणाऱ्या केशरकाकू अजूनतरी
हॉलमध्ये आलेल्या दिसत नव्हत्या..! बघता बघता शिबिराची वेळ संपत आली होती. आणि एवढ्यात समोरुन केशरकाकू सावकाशपणे चालत येताना दिसल्या..! सतत दुसऱ्यासाठी धावपळ करणाऱ्या केशरकाकू आज त्यांच्या आधारासाठी काठी घेऊन चालत होत्या आणि त्यांच्या दुसऱ्या हातात कागदाचं कसलं तरी भेंडोळ होतं.!
अवघा हॉल थोडसं चकित होऊन त्यांच्याकडे पाहू लागला. जवळ जवळ सहा महिन्यानी केशरकाकू आज सगळ्यांना घराबाहेर आलेल्या दिसल्या होत्या.! हळूहळू चालत येऊन त्यांनी डॉक्टरांना नमस्कार केला..डॉक्टरांनी त्यांना समोर खुर्चीवर बसायला सांगितलं.. केशरकाकू सावकाशपणे खुर्चीवर बसल्या आणि त्यांनी त्यांच्या हातातलं ते भेंडोळ डॉक्टरांकडे दिलं...
" डॉक्टर..मला तुमची मदत हवीय.. मी 'मरणोत्तर नेत्रदान' करायचं ठरवलयं.. आणि त्याची ही कागदपत्रं मी वकीलाकडून तयार करून आणली आहेत.! "
केशरकाकू शांतपणे बोलत होत्या. इतकावेळ हास्यविनोद आणि कॉमेंट्स यांनी भरलेलं सभागृह अचानक शांत झालं होतं.
"दोन वर्षांपूर्वी 'अक्युट डायबेटीस'मुळं माझ्या मिस्टरांचे डोळे गेले आणि तेंव्हापासून त्यांच्या अंध दृष्टीतल्या वेदना मला अस्वस्थ करत आहेत.. मला रोज जाणवणारऱ्या त्यांच्या त्या वेदनांनी माझ्याच जगण्यातलं चैतन्य हिरावून घेतलयं.. माझ्या जगण्यातला आनंद निघून गेलाय आणि मला ह्या जगात बघण्यासारखं काहीं उरलं नाही असं वाटायला लागलयं. पुनर्जन्म असतो की नाही मला माहीत नाहीय.. माझ्या जीवनातला प्रकाश नियतीनं हिरावून घेतला असला तरी मी पण माझं व्रत सोडणार नाहीय ! ह्या डोळ्यांचा उपयोग माझ्यानंतर आपल्या नवऱ्यावर नितांत प्रेम करणाऱ्या एखाद्या अंध स्त्रीला व्हावा आणि तिच्या वैवाहिक जीवनात एक नवा प्रकाश यावा एवढीच माझी इच्छा आहे आणि त्यासाठी माझे हे डोळे आपल्या पतिवर नितांत प्रेम करणाऱ्या एका अनामिक स्त्रीसाठी दान करायचं मी ठरवलं आहे..!!"
एवढं बोलून आणि आणलेली कागदपत्र आणि संमतीपत्र डॉक्टरांच्या हातात देऊन केशरकाकू उठल्या. पुन्हा एकदा डॉक्टरांना आणि हॉलमध्ये बसलेल्या सगळ्यांना त्यांनी नमस्कार केला आणि काठीचा आधार घेऊन त्या हळूहळू परत जायला निघाल्या.
सकाळपासून उत्साहानं चैतन्यानं भरलेला हॉल आता निस्तब्ध होता. निशब्द झाला होता. जगावेगळं काहीतरी घडलं होतं..! आणि क्षणार्धात त्या हॉलचा आसमंत टाळ्यांच्या कडकडाटानं भरून गेला..!
हॉलमधल्या प्रत्येकानं केशरकाकूंना उभं राहून मानवंदना दिली होती..!!
पुन्हा एकदा नियतीवर त्यांनी मात केली होती.
एका अनामिकेसाठी आपले डोळे दान देणाऱ्या आधुनिक 'गांधारी'च प्रत्यक्ष दर्शन त्यांना घडलं होतं..!!!
कृष्णकेशव.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा