आज ही त्याला आठवतोय तो दिवस. अगदी लख्खपणे. गावातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या गेटपाशी झोळी घेऊन उभा राहिलेला तो. भिक्षा घेण्यासाठी झोळी पसरवलेला तो. आतुरतेने साठे काकूंची वाट पहात होता. काकूही त्याची वाट पहायच्या. त्याचं गोजिरवाणे रुप अगदी मनाला स्पर्शून जायचं. खुप कमी वयात पोरका झालेला श्रीधर पाचवी कक्षेत शिकत होता. गावातील एका मराठी शाळेत शिकताना मास्तरचा खरपूस मार खाणंही त्याला गोड वाटे. घरी रागावणारं आपलं असं कोणी नव्हतं. कोकणातील एका छोट्या गावात त्याचं घर होतं. डोक्यावर घरं होतं. पण स्वयंपाक रांधायला कुणी नव्हतं. घरातील साफसफाई करायचा. ज्याला मदत लागेल तशी कामंही करुन द्यायचा. जिथे कमी तिथे श्रीधर. गावातील माणसंही प्रेमळ होती. पण कुणी जास्त श्रीमंत तर कोणी खुप गरीब.
साठे काकू म्हणजे गावातील प्रतिष्ठित व्यक्तीच्या सुविद्य पत्नी होत्या. भिक्षा मागून जगणाऱ्या श्रीधरबद्दल अपार माया दाटून येई त्यांच्या मनात. घरात आर्थिक सुबत्ता होती. मुलंही शहरातील चांगल्या महाविद्यालयात शिक्षण घेत होती.कशाचीच कमी नव्हती. माहेरुन गरीबी होती. तरीही त्या काळात पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले होते. पण पुरुषी अहंकारापुढे स्त्रियांना नतमस्तक व्हावे लागे. काय कमी आहे आपल्याला ? सगळं काही तर आहे. असे म्हणून घरातील चार भिंतींमध्ये कोंडले गेलेले जीवन होते साठे काकूंचे. घरातील कामे आवरली की पुस्तके, वर्तमानपत्र वाचण्यात वेळ घालवायच्या. पण पुढे शिकण्याची मनातील सुप्त इच्छा कधी कधी उफाळून यायची. एक दिवस श्रीधर दारात आला. भिक्षां देही म्हणत. घरातील भाजी पोळी देण्यासाठी दरवाजा उघडला. मग विचारपूस केल्यावर समजलं की त्यालाही शिकण्याची प्रचंड आवड आहे. खूप छान वाटले त्यांना. पण तरीही त्यांनी दटावले. हे बघ बाळा तुला जर मोठा साहेब व्हायचे असेल तर कष्ट करावे लागतील.
आजपासून तुला मी भिक्षेऐवजी एक पुस्तक वाचायला देईल. तुझी पोटाची भुक भागेल पण बुद्धीच्या भुकेचे काय ? दर वेळी काकूंकडून नवीन नवीन पुस्तके मिळायला लागली. कधी शाळेची फी तर कधी वह्या-पुस्तके तर कधी गणवेषही, श्रीधर अनाथ असला तरी मेहनती होता. अभ्यासात हुशार होता. पण पोटात काही नसले की काही सुचायचे नाही त्याला. सहावी सातवीपर्यंत भिक्षा मागून त्याचे पोट भरे. तो गावातील सर्व काकूंचा खरंच ऋणी होता. पण साठे काकूंकडून मिळालेली पुस्तकरुपी भिक्षा त्याला आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. दहावीला श्रीधर तालुक्यातून पहिला आला. आनंद कुणाला सांगावा असं त्याचं आपलं कोण होते त्याला. साठे काकूंना बाहेरुनच आवाज दिला. काकू, आज मला भिक्षा नको. फक्त तुमचे आशीर्वाद हवेत. काकूंनी आतून आवाज दिला. श्रीधर बाळ, क्षीण आवाज आला आतून. श्रीधर आत गेल्यावर त्यानं काकूंना तापाने फणफणलेले पाहिले. पटकन मीठ-पाण्याच्या पट्ट्या डोक्यावर ठेऊ लागला. एक तासानं काकूंना बरंचसं हायसं वाटू लागले. आता त्याला स्वयंपाकही छान जमायला लागला होता. काकूंना त्यानं कणकेची पेज बनवून खाऊ घातली. तेवढ्यात साठे काका आले. अतिशय अहंकारी माणूस. श्रीधरसारखा गरीब मुलगा तोही घरात बघून संतापले. श्रीमंत गरीबीमधली दरी कधी मिटणार होती ? असो.
श्रीधरचं पुढील शिक्षण स्कॉलरशिपवर पुर्ण झालं. म्हणतात नं लोहाचे सोने व्हायला एखाद्या परीसस्पर्शाची गरज असते. तसेच काही तरी काम साठे काकूंनी केलेले होते. श्रीधरनं महाविद्यालयात शिकताना एका दुकानात नोकरी धरली. कमवा व शिका ह्या प्रेरणेतून तो द्विपदवीधर झाला. तिथेही चांगला गुणांनी पास झाला. एम.पी.एस.सी.पास झाला. लवकरच जिल्ह्याचा कलेक्टर म्हणून रुजू झाला. सुखाचे दिवस आले. पण गावातील ते जुने दिवस तो कधीच विसरू शकत नव्हता. ज्या वळणावर तो येऊन ठेपला होता ते वळण अतिशय सुंदर होते. अनेक हालअपेष्टा,कष्ट. वेळी खाण्यास काहीच न मिळाल्याने पाणी पिऊन झोपणे सर्व काही त्याच्या डोळ्यात पाणी आणि. साठे काकूंची ती भिक्षा खुप महत्वाची ठरली त्याला आत्मनिर्भर होण्यासाठी. आज त्याची पावलं गावाकडे वळली. गावातलं घर तसंच होते उभे त्याची वाट पहात. घरातील धूळ झटकली. घर डोळे भरुन पाहून घेतले. गावात फेरफटका मारताना साठे काकूंना आवर्जून भेटला. आयुष्याच्या महासागरातील दिपस्तंभ होत्या त्या. काळ पुढे सरकला होता. पण त्या तिथेच होत्या स्थितप्रज्ञं. साठे काकांना जाऊन दोन वर्षे लोटली होती. एकट्याच होत्या. दोन्ही मुलं अधुनमधून यायची. पण बाकी अशा एकट्याच रहायच्या तिथे त्या.
श्रीधरनं वाड्याच्या दरवाजाची कडी वाजवली. तशी पाच मिनिटांत दरवाजा उघडला. काकूंनी प्रथम ओळखलंच नाही. उंच,रुबाबदार, सुटबुटातला साहेब माणूस. काकूंसमोर नतमस्तक झाला. श्रीधर काकूंच्या पदस्पर्शाने कृतकृत्य झाला. त्यांचे थकलेले हात डोक्यावरुन फिरले आणि श्रीधरच्या डोळ्यातील अश्रुंना वाट मिळाली. काकू आज मी तुम्हाला माझ्याबरोबर घेऊन जायला आलोय. तुम्ही नाही म्हणणार नाहीत. ही आशा वाटते.
नाही रे बाळा मी ह्या वाड्यातच ठिक आहे. आमची स्वप्नपुर्ती इथेच तर झाली. सवयीचं आहे हे घर. पण आता मला तुमच्या मार्गदर्शनाची खरोखर गरज आहे. तुम्ही केलेल्या भिक्षारुपी मदतीची परतफेड करायची आहे.
खुप आग्रहानंतर साठे काकू शहराकडे निघाल्या. तिथे शहरातही त्या आजुबाजुच्या झोपडपट्टीतील मुलांना असंच मार्गदर्शन करणार आहेत. असं वाक्यं श्रीधरनं म्हणताच काकूंना कोण आनंद झाला माहिती आहे. त्यांची पावलं आपोआप शहराकडे वळाली.
प्रांजली .....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा