या दोन सख्ख्या बहिणी आहेत. दोघीही ॲम्बुलन्स चालवतात... मृतदेह उचलतात, रात्री-अपरात्री अपघात झालेल्या रुग्णांना तातडीने दवाखान्यापर्यंत पोहचवतात! पिंपरी चिंचवड, पुणे-मुंबई हायवे परिसरात दिवसा-रात्री सायरन वाजवत कोणी स्त्री जर ॲम्बुलन्स चालवताना तुम्हाला दिसली असेल तरी ती या दोघींपैकी एक असेल !
कोविड नंतर काही कारणांनी यांचं कौटुंबिक आयुष्य बदललं आणि या दोघी बहिणींनी ॲम्बुलन्स चालवण्याचा निर्णय घेतला. स्त्रीनं ॲम्बुलन्स चालवणं ही साधी गोष्ट नाही, त्यांच्या डोक्यात अशी संकल्पना येणं खरंतर हीच मोठी क्रांतिकारी घटना आहे. हे काम करणं खरंतर पुरुषांची मक्तेदारी... आणि का असू नये? वेळी-अवेळी कधीही इमर्जन्सी येते, रुग्ण गंभीर असतात, रस्त्यावर कोण कसं असेल माहीत नाही, गुन्हेगार असतात, मदतीला कोणी आहे, नाही. हायवेवरील अपघात असेल, एखाद्या झोपडपट्टीच्या गल्लीतील इमर्जन्सी रुग्ण असेल किंवा कुठून एखादा फाशी घेतलेला मृतदेह घेऊन येणं असेल... कोणत्याही परिस्थितीत काम करावं लागतं. एका स्त्रीनं हे काम करणं किती अवघड असेल याची कल्पना करून बघा... इथं दोघी आहेत!
कुठूनतरी अचानक फोन येतो, ठिकाण सांगितलं जातं, ताबडतोब ॲम्बुलन्स काढली जाते आणि त्या ठिकाणी जाऊन रुग्णाला उचलून गाडीत टाकलं जातं. मदतीला कोणी व्यक्ती , पोलिस असेल तर ठीक, नाहीतर स्वतःच ते काम करायचं. गरज पडली तर ऑक्सिजन लावायचा, सीपीआर सुद्धा द्यायचा. अपघात झाल्यानंतर दवाखान्यात पोहचेपर्यंतचा जो 'गोल्डन पिरेड' असतो तो रुग्णाच्या जीवासाठी फार महत्त्वाचा असतो. या दोघी देवदूत बनून ते काम करतात. आजवर यांनी शेकडो रुग्ण मरणाच्या दारातून दवाखान्यापर्यंत पोचवलेले आहेत, लोक वाचवलेले आहेत.
माझ्या बाजूला ज्या ताई उभ्या आहेत त्यांचा एक अनुभव अगदी कमी शब्दात इथे देतोय. काही दिवसांपूर्वी मध्यरात्री एका ठिकाणी काहीतरी घडले आहे म्हणून त्यांना एक फोन आला आणि त्या ताई एकट्या तिथे पोहोचल्या. एका सुमसान ब्रिजखाली एक माणूस पडलेला होता, त्याचं अख्खं शरीर रक्तानं भरलं होतं. जवळ जाऊन पाहिलं तेव्हा त्यांना दिसलं की त्या माणसाने काचेची बॉटल स्वतःच्याच गळ्यामध्ये खूपसुन घेतली होती, तो अजूनही स्वतःला हानी पोहोचवत होता. अशावेळी एकटी स्त्री, समोर अशी गंभीर परिस्थिती... खरंतर त्यांनी तो कॉल घेतला नसता तरी चाललं असतं, यात त्यांचा काही आर्थिक फायदाही नव्हता पण त्याचा जीव गेला असता. त्या अवस्थेत यांनी त्याला एकटीनं उचलून ॲम्बुलन्समध्ये टाकलं. तो एक मनोरुग्ण होता हे गाडी सुरू केल्यानंतर त्यांना समजलं. तो रक्ताने माखलेला माणूस मागच्या सीटवर बसून मोठ्याने ओरडत होता... खरंतर आता यांच्याच जीवाला धोका होता! तरीही त्यांनी त्या माणसाला बाहेर न काढता अवघ्या काही मिनिटांत आमच्यासमोर आणलं... त्या माणसाला त्यांनी कसं आणलं हे त्यांनाच माहीत पण तो 'माणूस वाचवला'!
आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे रेल्वे कटिंग! त्यांची ॲम्बुलन्स अपघात विभागासमोर लागली आणि त्या घाई गडबड न करता चालत येताना दिसल्या की माझा पहिला प्रश्न असतो... रेल्वे कटिंग आणलंय का? आणि त्या 'हो' म्हणून मान हलवतात. बरेच लोक स्वतः रेल्वेमधून पडलेले असतात, काहींचा अपघात असतो, काहींना ढकलून दिलेलं असतं. अक्षरशः शरीराच्या चिंधड्या झालेल्या असतात! घटनास्थळावर जायचं, ज्या रेल्वे स्टेशनच्या परिसरात ही घटना घडली आहे तिथलं कोणीतरी मदतीला घ्यायचं, नसेल तर स्वतःच ते सगळे विखुरलेले भाग गोळा करून कपड्यात गुंडाळायचे आणि घेऊन यायचं. आपण कल्पनाही करू शकत नाही की प्रत्यक्षात तो कसा अनुभव असेल!
आयुष्यात काहीतरी परिस्थिती आली आणि त्यांनी हा मार्ग निवडला. या सगळ्या गोष्टीत त्यांच्या आर्थिक गोष्टीही असतील. कुटुंब सांभाळत हे काम करणं फार मोठी गोष्ट आहे. चित्रपटात आपण डॅशिंग काम करणाऱ्या नायिका बघतो... वास्तव जीवनातील या दोघी खऱ्या नायिका आहेत ज्यांनी आजवर असंख्य स्त्री-पुरुषांना वाचवलं, मृत्यूच्या दारातून बाहेर काढलं.
खूप अनुभव आहेत सगळंच नाही लिहिता येणार. खऱ्या आयुष्यातील या योद्ध्या आहेत... आपलं दैनंदिन आयुष्य जगत असताना असंही कोणीतरी बाहेरच्या जगात आहे हे आपल्याला माहीत नसतं. त्यांची कुठेतरी नोंद व्हावी म्हणून हा लिखाणाचा प्रयत्न. त्यांना म्हटलं तुमच्यावर एक लेख लिहायचा आहे, परवानगी द्या... आणि त्यानंतर हा सुंदर फोटो काढला.
गरजूंना 'गोल्डन पिरेडमध्ये' वाचवणाऱ्या अशा 'गोल्डन स्त्रियांना' अभिवादन 🙏🏼
डॉ. प्रकाश कोयाडे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा