आज सकाळी बेसिन समोर दाढी करण्यासाठी उभा होतो. बेसिन वरील आरशात पाहिलं. चार दिवस दाढी करायचा कंटाळा केला, त्यामुळे दाढीचे खुंट वाढले होते. दाढीचे खुंटावर हात फिरवत होतो आणि इलेक्ट्रिक शॉक बसावा तशी एक गोष्ट स्मरणात आली. आमच्या बँकेत अकाऊंटला काम करणारा अधिकारी प्रमोद गाडगीळ याची काही महिन्यांपूर्वी आई वारली म्हणून त्याच्या घरी त्याला भेटायला गेलो होतो. तेव्हा बोलण्याच्या ओघात काहीतरी वैद्यकीय विषय निघाला. सध्याचे डॉक्टर्स, त्यांच्याकडे येणारे भरमसाठ पेशंट्स, त्यामुळे डॉक्टरांची पेशंटच्या बाबतीत होणारी दिरंगाई, निष्काळजीपणा, पैसे कमवण्यासाठी पेशंटला हॉस्पिटलाईज करून डांबून ठेवण्याची सध्याची वैद्यकीय व्यवसायातील वाढती वृत्ती वगैरे. प्रमोदने त्यावेळी एका हॉस्पिटलमध्ये घडलेली "सत्य घटना" सांगितली होती. यातील स्थळ-काळ-वेळ, नाव काल्पनिक आहेत. पण घटना सत्य आहे.
स्थळ
पुण्यातील एका प्रतिष्ठित डॉक्टरांचं भलमोठं हॉस्पिटल.
आय. सी. यू. वॉर्ड.
नित्यानंद अठ्ठावीशीचा पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनियर.
त्याचे वडील रामानंद वय वर्षे 68 शासनाच्या पाटबंधारे खात्यातील निवृत्त झालेले अधिकारी.
बी.पी. आणि शुगरचा त्यांना त्रास.
त्यामुळे त्यापाठोपाठ हार्टच दुखणं आलेलं.
छातीत पेन होऊ लागल म्हणून पंधरा दिवसापूर्वी दवाखान्यात अॅडमिट केलं होतं त्यांना.
ऍडमिट केल्यानंतर दोन-तीन दिवसातच लगेच त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं.
व्हेंटीलेटर लावूनही दहा दिवस होऊन गेले होते.
नित्यानंदाच्या हॉस्पिटलच्या सकाळ-दुपार-संध्याकाळ वाऱ्या चालू होत्या.
नित्यानंदाच्या कुटुंबातील मंडळी आलटून-पालटून सोयीनुसार पाळी लावून दवाखान्यात थांबत होती.
रामानंदांच्या तब्येतीत म्हणावी तशी सुधारणा होत नव्हती.
नित्यानंदची घालमेल चालू होती.
वडिलांना लवकर बर वाटाव. त्यांचा वेंटीलेटर काढून टाकला जावा.
आय. सी. यु. मधून जनरल रूम मध्ये लवकरात लवकर वडलांना शिफ्ट केल जाव.
अशी त्याची मानसिकता होती. हीच त्याची मनोमन इच्छा होती.
रोज सकाळ दुपार डॉक्टरांचे राऊंड होत होते.
"पेशंट इज नॉट रेस्पोंडींग दॅट मच.
बट् वी आर ट्राइंग अवर बेस्ट"
एवढच उत्तर नित्यानंदला रोज डॉक्टरांचेकडून मिळत होतं.
रामानंदांच्या शेजारच्या बेडवर खेडेगावातील एक पेशंट अॅडमिट होता.
त्या पेशंट बरोबर त्या पेशंटच्या
नात्यातीलच एक सत्तरीला आलेले म्हातारे गृहस्थ अटेंडंट म्हणून आले होते.
वडीलांसाठी नित्यानंदाचा तुटणारा जीव आणि त्याची घालमेल,
हे आजोबा रोज न्याहाळत होते.
व्हेंटिलेटर लावून दहा दिवस होऊन गेले, तरीही वडिलांच्या तब्येतीत फरक पडत नाही म्हणून नित्यानंद हताश झाला होता.
आणि वडिलांच्या पायाशी बेडवर बसला होता.
शेजारच्या पेशंट जवळ खुर्चीवर बसलेले ते खेडेगावातील आजोबा नित्यानंदच्या जवळ गेले.
ते नित्यानंदला म्हणाले.
"बाळा आपल्या वडीलासाठी खूप करतोयस तू.
गेले आठ दिवस मी बघतोय रोज तुला.
वडिलाची एवढी काळजी करणारी पोरं, या जमान्यात मिळन लै कठीन होऊन बसलय बग.
तसा तुझा बा लय भाग्यवानच म्हनायचा.
मी जरा बोलू का तुझ्या संगट तुझ्या बापाच्या तब्येतीविषयी".
नित्यानंद म्हणाला
"बिनधास्त बोला आजोबा"
आजोबा म्हणाले
"पोरा, तुझ्या बा ला अॅडमिट करून बारा पंधरा दिवस झाले का?
नित्यानंद
"हो, बारा दिवस झाले"
आजोबा
"हयो वेंटीलेटर लावून दहा दिवस होऊन गेल न्हव"
नित्यानंदं
"हो दहा दिवस होऊन गेले.
आज अकरावा दिवस".
आजोबा
"मग या धा दिसात तुझ्या बा ची दाडी वाढाया पायजे न्हव.
नित्यानंद
"हो वाढायला पाहिजे"
आजोबा
"मग तुझ्या बा ची दाडी धा दिसात वाढल्या का?"
नित्यानंद
"नाही,
अजिबात वाढलेली नाही
त्यांना ॲडमिट करताना जेवढी दाढी होती त्यामध्ये वाढ झालेली नाहीये"
आजोबा
"नित्यानंद बाळा,
मला जेवढं कळतं तेवढ मी बोलतुया.
आम्ही खेड्या गावची आडगी, अशिक्षीत मानसं हाय.
विस्वास ठेव अगर ठेवू नगस.
मानुस जित्ता असला तरच त्याची दाडी वाडतीया.
प्रेताची दाडी वाढत न्हाय, बाळा"
नित्यानंद डोक्याला हात लावून मटकन खाली बसला.
काही क्षण तसेच निघून गेले.
आजोबांनी प्रेमानी नित्यानंदच्या पाठीवरून हात फिरवत त्याला धीर दिला.
नित्यानंद उठला त्यांन आजोबांच्या कडं विलक्षण नजरेन पाहिलं.
त्या नजरेत
आजोबांच्या अगाध ज्ञानाबद्दल आदर होता.
स्वतःबद्दल कीव होती.
डॉक्टरांच्या बद्दल प्रचंड राग होता.
नित्यानंदच्या त्या नजरेत या सगळ्या संमिश्र भावना आजोबांना जाणवत होत्या.
नित्यानंदच्या मनात सरकन एक विचार येऊन गेला.
"काय भुललासी वरलिया रंगा"
नित्यानंदंने क्षणाचाही विलंब न लावता ड्युटीवर असलेल्या सिस्टरला जोरात हाक मारली.
त्याच्या आवाजातील जोर ऐकून सिस्टर धावतच नित्यानंद समोर येऊन उभी राहिली.
सिस्टर
"येस सर"
नित्यानंद
"रिमूव्ह द व्हेंटीलेटर"
-------------------------------------
मित्रहो, वैज्ञानिक दृष्ट्या या कथेतील भावार्थ "योग्य की आयोग्य" याबाबत खरंच काही कल्पना नाही. पण जी गोष्ट भावली, ती तुमच्या समोर मांडली. एवढच. लेख माझा नाही.. फॉरवर्ड केला आहे.. आजकाल महागड्या व्हेंटिलेटरवर मृत पेशंटला ठेवून बिल उकळण्याचे गैरप्रकार वाढीस लागलेले आहेत.. त्यावरचा हा एक लेख.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा