शनिवार, ३१ जानेवारी, २०२६

2525. हस्तिदंती मनोऱ्यातील राजकन्या

 त्याचे जिवाभावाचे मित्रच त्याला माझ्याकडे घेऊन आले होते कारण त्याच्या आई - वडिलांनी त्याची आशा पूर्ण सोडून दिली होती. तो आपल्या वृद्धापकाळाचा आधार होईल अशी शक्यता आता त्यांना अजिबात वाटत नव्हती. त्याच्या साध्याभोळ्या आईने तर हाय खाऊन अंथरुण धरले होते. 
त्याच्या मित्रांनी सांगितलेली त्याची हकीकत मोठी विलक्षण होती. 
तो एका नामवंत व्यवस्थापनशास्त्राच्या शिक्षणसंस्थेत मॅनेजमेंटच्या फायनल इयरला शिकणारा अत्यंत हुशार विद्यार्थी होता. ती संस्था शिक्षणासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीही सुप्रसिद्ध होती. अशाच एका सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याची शहरातील एका नामवंत कोट्यधीश व्यावसायिकाच्या मुलीशी ओळख झाली. हळूहळू त्यांची मैत्री वाढत गेली. दोघंही एकमेकांना आवडत होते. पण दोघांच्या आवडण्याची जातकुळी वेगळी होती. ती त्याला जीवनसाथी म्हणून हवी होती पण तो तिला फक्त एक उमदा मित्र म्हणून प्रिय होता. तिच्या मनमोकळ्या वागण्याचा चुकीचा अर्थ लावून त्याने तिला एक दिवस प्रपोज केलं. अर्थातच त्या गर्भश्रीमंत तरुणीने त्याला स्पष्ट नकार दिला.
तिच्या नकारानंतर त्याचं भावविश्व उध्वस्त झालं. त्याने अभ्यास करणं , काॅलेजला जाणं सोडून दिलं. तो दिवसभर निराश अवस्थेत इकडंतिकडं भटकत राहायचा. रात्री  - अपरात्री त्याला वाटेल तेव्हा घरी परत यायचा. वाटलं तर जेवायचा नाही तर उपाशीपोटी भटकत राहायचा. हे सगळं पाहून त्याच्या आई - वडिलांच्या काळजाचं पाणी पाणी होत होतं.एकुलता एक हुशार मुलगा आपल्या डोळ्यांदेखत हाताबाहेर जात असलेला पाहून ते अक्षरशः हतबल झाले होते. अशा स्थितीत त्याचे जिवलग मित्र त्याला आता माझ्याकडे घेऊन आले होते. 
मी त्याची जन्मपत्रिका बघितली. अजून दहा - बारा वर्षे राहू महादशेचा काळ होता. पंचम स्थान सध्या पापग्रहांची दृष्टी असल्याने कमकुवत बनलं होतं. अशा ग्रहस्थितीत अजून काही वर्षे तरी त्याचं प्रेम यशस्वी व्हायची कोणतीही चिन्हं दिसत नव्हती. पण याक्षणी त्याला हे सगळं सांगून काहीच उपयोग होणार नव्हता. त्यामुळे मी त्याला खूप वेगळ्या पद्धतीने समजावण्याचं ठरवलं.
मी त्याला म्हणालो , " ती तुझ्याशी लग्न करायला तयार होईल असा उपाय मी तुला देऊ शकतो. पण त्याआधी तुला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. 
मला सांग की लग्नानंतर तू तिला कुठं ठेवणार आहेस  ?? "
तो आश्चर्याने माझ्याकडे बघत म्हणाला , " माझ्या घरीच ठेवणार ना. माझ्या वडिलांचा टू बीएचके फ्लॅट आहे. "
मी म्हणालो , " तुझ्या अख्ख्या घराएवढी तिची बेडरुम आहे. तुझ्या घरात महिन्याला जेवढे पैसे येतात तेवढा तिचा पाॅकेटमनी आहे. लग्नानंतर तुझ्या गळ्यात हात टाकून तिने लाडिकपणे तुला एखादा ड्रेस मागितला तर ती वापरत असलेले हजारो रुपयांचे डिझायनर ड्रेस तू विकत घेऊन तिला देऊ शकणार नाहीस. त्यामुळे ती दुःखी होईल. अशाप्रकारे ती दुःखी झालेली तुला चालेल का  ?? "
माझे अनपेक्षित बोलणे ऐकून त्याला प्रचंड धक्का बसला होता.
मी पुढे बोलायला सुरुवात केली , " ती दुःखी झालेली जसं तुला आवडणार नाही तसंच तिच्या माहेरच्या लोकांनाही आवडणार नाही. मग तिची आई दर महिन्याला आलिशान घेऊन तुझ्या घरी येईल. तिच्या लाडक्या लेकीसाठी ती अत्यंत महागड्या वस्तू घेऊन येईल. तू जावई असल्यामुळे तिची आई तुला थेट काहीच बोलणार नाही. फक्त जाताना तुझ्याकडे एक नजर टाकेल. त्या नजरेत तुला एक प्रश्न दिसेल की तुझी ऐपत नसताना तू माझ्या मुलीशी का लग्न केलंस  ??
तिच्या नजरेत दिसणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडे आहे का  ?? "
त्याने नकारार्थी मान हलवली. आता तो खाली मान घालून बसला होता. तो कुठेतरी आतून हलला होता.
मग मी त्याला शेवटचा धक्का दिला , " ती हस्तिदंती मनोऱ्यात राहणारी राजकन्या आहे हे तू समजून घे. तिच्याशी लग्न करायचं असेल तर आधी तुला हस्तिदंती मनोरा बांधावा लागेल. त्यासाठी खूप पैसे कमवावे लागतील. तू हुशार आहेस आणि तुझ्याकडे टॅलेंट आहे. त्यामुळे तू हे नक्कीच करु शकतोस. फक्त हे आव्हान स्वीकारण्यासाठी तुला मनाची तयारी करावी लागेल. "
महाभारत युद्धाआधी अर्जुन हतबल होऊन बसला भगवान श्रीकृष्णांनी त्याला गीता सांगितली होती. माझ्यासमोर प्रेमाच्या रणांगणात हातपाय गाळून बसलेल्या या एकविसाव्या शतकातील अर्जुनाला मी कर्माचे महत्व समजावले होते.
त्यानंतर मला अपेक्षित होते तेच घडले. तो अक्षरशः पेटून उठला. त्याच्या स्वाभिमानाला डिवचल्याने तो आवेशाने उठून उभा राहिला. त्याच्या पुरुषार्थालाच आव्हान मिळाल्याने त्याचे बाहू स्फुरण पावू लागले. क्षणार्धात तो ताडताड पावले टाकत निघून गेला.
त्याचे जिवलग मित्र तो गेलेल्या दिशेकडे आ वासून बघत राहिले. भानावर येत त्यांच्यापैकी एकाने माझी पत्रिका पाहण्याची फी दिली आणि ते सगळे निघून गेले.
या घटनेला जवळपास पंधरा वर्षे लोटली. रोजच्या कामाच्या रहाटगाडग्यात मी हा प्रसंग साफ विसरुन गेलो. 
एक दिवस मी रस्त्याने जात असताना एक आलिशान मर्सिडीझ कार अगदी माझ्या जवळ येऊन थांबली. मी वळून पाहिले तर कारचा दरवाजा उघडून एक व्यक्ती उतरुन माझ्याकडेच येत होती. माझा स्वतःच्या डोळयांवर विश्वास बसत नव्हता. तो तोच होता. पण याक्षणी मात्र थ्री पीस सूटमध्ये फारच रुबाबदार दिसत होता. 
त्याने विचारले , " ओळखलंत का मला  ?? "
मी प्रत्युत्तरादाखल मान डोलावली. 
तो पुढे म्हणाला , " तुमच्या भेटीनंतर माझ्या अंगात जणू वीजच संचारली होती. मी मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण करुन काही वर्षे भारतात नोकरी करुन थेट अमेरिकेची वाट धरली. तिथं काही वर्षे नोकरी करुन स्वतःचा व्यवसाय सुरु केला. त्यानंतर काही वर्षातच तुम्ही दिलेल्या सल्ल्याप्रमाणे मी आलिशान हस्तिदंती मनोरा बांधला. "
मी हसून गमतीने विचारले , " मग आता तुला मी राजकन्येला वश करण्यासाठी उपाय देऊ का  ?? "
यावर त्याने फार मार्मिक उत्तर दिले. 
तो म्हणाला , " हस्तिदंती मनोरा बांधल्यावर राजकन्येला वश करण्याची गरज नसते. ती आपोआप स्वतःहून येत असते. अशीच एक राजकन्या स्वतःहून आली आणि तिच्याशी लग्न करुन मी आता माझ्या मुलांसह खूप सुखात आहे. "
हे ऐकून मला खूप आनंद झाला. 
त्याने स्वतःच्या हिंमतीवर राजकन्येला जिंकले होते याचे मला फार समाधान वाटले.
मग त्याच्याशी थोडावेळ बोलून मी समाधानाने तिथून निघालो. 

-  जितेंद्र अभ्यंकर
    8605396156

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...