शनिवार, ३१ जानेवारी, २०२६

2519. भार्गवी

 "भार्गवी ताई, अहो बाहेर 'हाऊसफुल्ल'चा बोर्ड लागलाय... लोकं ब्लॅकने तिकीट मागायला लागल्यात. त्या पहिल्या रांगेतली 'ए-१' (A-1) नंबरची खुर्ची आपण रिकामी का ठेवतोय? एकाने तर त्या सीटसाठी ५००० रुपये फेकले तोंडावर!"
"रघू काका, ती खुर्ची विकायची नाय... ती माझ्या 'लकी चार्म'ची हाय."
"कोणाची हाय ताई? कलेक्टर साहेब येणार आहेत का?"
"नाय ओ काका... त्या खुर्चीवर माझा 'देव' बसलाय, जो डोळ्यांना दिसत नाय, पण काळजाला जाणवतोय."
पुण्याचं बालगंधर्व रंगमंदिर. नाटकाची तिसरी घंटा वाजायला काही मिनिटं बाकी होती. ग्रीन रूममध्ये प्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी साठे आरशासमोर बसली होती. बाहेर प्रेक्षकांचा गोंगाट सुरू होता. भार्गवी आज महाराष्ट्रातली सर्वात मोठी नटी होती, पण तिच्या चेहऱ्यावर यशाचं तेज नसून एक जुनी खंत होती.
तिसरी घंटा वाजली. "टण... टण... टण..."
पडदा उघडला. भार्गवी स्टेजवर आली. टाळ्यांचा कडकडाट झाला. पण तिने संवाद सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे स्टेजच्या अगदी कडेला येऊन, पहिल्या रांगेतील त्या रिकाम्या 'ए-१' खुर्चीकडे बघून हात जोडले आणि वाकून नमस्कार केला. प्रेक्षक कुजबुजले, "हिला काय वेड लागलंय? रिकाम्या खुर्चीला का वाकतेय?"
कुणालाच माहित नव्हतं की त्या रिकाम्या खुर्चीमागे एक भयानक भूतकाळ दडला होता.
भार्गवी एका खेडेगावातली. तिचे वडील, 'आबा', हे गावातले कडक शिस्तीचे मास्तर. त्यांचा शब्द म्हणजे कायदा. भार्गवीला लहानपणापासून नाटकाचं वेड होतं. पण आबांचा त्याला सक्त विरोध होता.
"नाचणारी करायचं हाय का तुला? आपल्या खानदानात आजवर कुणी स्टेजवर जाऊन तमाशा केला नाय. हे नाटक-बिटक बंद कर, नाहीतर टांगा मोडीन तुझा!" आबांनी एकदा ताटावरून उठवत तिला झापलं होतं.
पण भार्गवीचं रक्त कलाकाराचं होतं. तिने लपून-छपून पुण्यातल्या एका स्पर्धेत भाग घेतला आणि तिला पहिलं बक्षीस मिळालं. ही बातमी आबांना समजली तेव्हा घरात महाभारत घडलं.
आबांनी भार्गवीच्या थो*बाडीत मा*रली आणि घराचा दरवाजा उघडून गरजले, "आजपासून तुझा अन माझा संबंध संपला. तुला ती नाच-गाणीच करायची आहेत ना? मग जा... पण पुन्हा या उंबऱ्याच्या आत पाऊल टाकू नकोस. माझ्यासाठी तू मेलीस!"
त्या रात्री भार्गवी रडत रडत घर सोडून पुण्यात आली. तिला जिद्द होती, "एक दिवस मोठी नटी होऊन दाखवेन आणि आबांनाच माझ्या नाटकाला बोलावून घेईन."
भार्गवी मोठी नटी झाली. तिचं नाव झालं. पण ती १० वर्षं घरी गेली नाही. तिला वाटत होतं, आबा अजूनही रागात असतील.
एका दिवशी तिला गाववरून निरोप आला, "आबा गेले. हृ*दयविकाराच्या झटक्याने वा*रले."
भार्गवीला धक्का बसला. ती सगळं काम सोडून गावी गेली. घराच्या अंगणात आबांचं पार्थिव पडलं होतं. १० वर्षांपूर्वी ज्या बापाने घराबाहेर काढलं होतं, त्याचा चेहरा बघून ती धाय मोकलून रडली. "आबा... मी जिंकले ओ, पण तुम्हाला हरवून काय उपयोग झाला?"
अंत्यविधी पार पडला. भार्गवी घरातल्या जुन्या वस्तू आवरत होती. आबांच्या खोलीत गेल्यावर तिने त्यांचे कपाट उघडले. तिथे कपड्यांच्या खाली एक जुनी डायरी आणि एक फाईल होती.
भार्गवीने ती फाईल उघडली आणि ती तिथेच जमिनीवर कोसळली.
त्या फाईलमध्ये भार्गवीच्या नाटकाच्या प्रत्येक बातमीचे पेपर कटिंग्ज होते. तिने कधी काय बक्षीस मिळवलं, तिचा कोणता फोटो पेपरमध्ये आला, हे सगळं आबांनी कात्रण करून जपून ठेवलं होतं.
आणि डायरीच्या शेवटच्या पानावर आबांनी थरथरत्या हाताने लिहिलं होतं:
"माझी भार्गवी... माझी लेक.
लोकं म्हणतात ती खूप मोठी नटी झालीय. मला लय अभिमान वाटतो ग तुझा. त्या रात्री तुला घराबाहेर काढलं, कारण मला भीती वाटत होती की या क्षेत्रात लोक तुला त्रास देतील. पण तू वाघीण निघालीस.
पोरी, आज तुझं पुण्यात बालगंधर्वला पहिलं मोठं नाटक हाय. मला यायचंय ग तुला बघायला. मी तिकीट पण काढलंय - पहिल्या रांगेतलं, 'ए-१' नंबरचं. पण... मी आत येणार नाही. जर तू मला समोर बघितलंस, तर तुला जुना राग आठवेल, तू नर्व्हस होशील. तुझा खेळ बिघडेल. माझा चेहरा तुझ्या यशाच्या आड नको यायला.
मी बाहेर उभा राहून फक्त टाळ्यांचा आवाज ऐकेन. तू लढ पोरी... तुझा हा खडूस बाप बाहेर उभा राहून तुझ्यासाठी टाळ्या वाजवेल."
त्या डायरीसोबत त्या दिवशीच्या नाटकाचं 'न वापरलेलं' तिकीट होतं. सीट नंबर ए-१.
भार्गवीला समजलं की आबा त्या दिवशी आले होते, बालगंधर्वच्या बाहेर उभे होते, पण फक्त लेकीच्या प्रेमापोटी ते आत आले नाहीत. त्यांनी स्वतःच्या इच्छा मारल्या, जेणेकरून लेकीचं स्वप्न पूर्ण व्हावं.
त्या दिवसापासून भार्गवीने शपथ घेतली.
"जोपर्यंत मी जिवंत आहे आणि या स्टेजवर उभी आहे, तोपर्यंत प्रत्येक शो ला पहिली सीट 'ए-१' माझ्या आबांसाठी राखीव असेल."
स्टेजवर भार्गवीचा डायलॉग संपला. तिने पुन्हा त्या रिकाम्या खुर्चीकडे पाहिलं. डोळ्यातून एक थेंब ओघळला. तिला भास झाला की त्या खुर्चीवर पांढरा सदरा आणि धोतर घातलेले आबा बसले आहेत आणि अभिमानाने टाळ्या वाजवत आहेत.
तिने मनाशीच म्हटलं, "बघा आबा... आज अख्खं जग माझ्यासाठी टाळ्या वाजवतंय, पण माझ्यासाठी सर्वात मोठी ताकद तुमची ती रिकामी खुर्चीच हाय!"
प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट झाला, पण भार्गवीची नजर फक्त त्या एका जागेवर खिळली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...