शनिवार, ३१ जानेवारी, २०२६

2518. सर्व कृतींच्या पाठीमागील शक्ती

 विज्ञानाच्या पलीकडे जे काही आहे, ते सर्व म्हणजेच परमेश्वर आहे, हे सिद्ध करणारी ही कहाणी आहे. आपण कर्ता असलो तरी करविता केवळ 'तो'च असतो हे दाखवून देणारा हा लेख आहे.
जीवनाचा खरा अर्थ आणि त्यापलीकडचे सत्य म्हणजे ‘देव’च आहे.
मी MRI स्कॅनकडे पाहिलं आणि अंगावर काटा आला. तो हॉस्पिटलच्या एअर कंडिशनरमुळे नव्हता, तर समोर दिसणाऱ्या दाहक सत्यामुळे होता. तो साक्षात मृत्यूचा आदेशच होता — काळ्या-पांढऱ्या अक्षरांत छापलेला.
या हॉस्पिटलमध्ये मला एक दंतकथा म्हणतात.
मी डॉ. सरवनन — व्हॅस्क्युलर सर्जरीचा निवृत्त प्रमुख.
चाळीस वर्षं मी मानवी शरीराच्या आत काम केलं आहे. चेन्नईच्या रस्त्यांपेक्षा मला माणसांच्या रक्तवाहिन्यांचा नकाशा अधिक चांगला माहीत आहे. धडधडणारी हृदयं मी हातात धरली आहेत, छतावर रक्त उडवणाऱ्या नसा मी शांत केल्या आहेत. पण त्या स्कॅनकडे पाहताना, इतक्या दशकांनंतर पहिल्यांदाच, मला स्वतःला मी सर्जन आहे असं वाटलं नाही. मला स्वतःचीच फसवणूक झाल्यासारखं वाटलं.
रुग्णाचं नाव गौरी होतं.
वय अवघं सव्वीस. एकटी आई. दोन शिफ्ट्समध्ये एका छोट्या उपहारगृहात काम करून घर चालवणारी. कॉफी ओतताना ती अचानक कोसळली. तिच्या मेंदूमधील अ‍ॅन्युरिझम (रक्तवाहिनी ज्या ठिकाणी कमजोर होते, त्या ठिकाणी नसतील रक्तदाबामुळे येणारा फुगीर भाग. रक्तदाब अधिक वाढला तर ही नस फुटू शकते आणि असीमित रक्तस्त्राव होऊ लागतो.) फक्त मोठा नव्हता — तो राक्षसी होता. मेंदूच्या अतिशय नाजूक भागाभोवती तो अजगरासारखा विळखा घालून बसला होता.
“हे ऑपरेशन शक्य नाही, वरदन,” न्यूरोलॉजी विभागप्रमुखांनी मान हलवत सांगितलं.
“आत गेलात तर टेबलवरच ती मुलगी रक्तस्राव होऊन मरेल. हात लावला नाहीत तरी ४८ तासांत नस फुटेल. दोन्ही मार्गांनी मृत्यूच.”
वैद्यकीय व्यवस्थेत आम्हाला जोखमी तोलून पहायला शिकवलं जातं. कायदेशीर जबाबदाऱ्या, यशाची टक्केवारी — सगळं.
तर्क सांगत होता, वहात लावू नकोस. निसर्गावर सोड. मागे फिर.' 
पण मग मी गौरीच्या डोळ्यांत पाहिलं आणि वेटींग रूम मध्ये बसलेली तिची चार वर्षांची चिमुकली मुलगी दिसली. वहीत चित्रं काढत, फाटके बूट घातलेली. गौरी गेली, तर ती मुलगी एकटी पडणार होती. बाहेरच्या जगात तिचे आईविना किती हाल होतील या विचारानेच तिच्याविषयी वाटणाऱ्या करुनेने माझे मन भरून गेले होते. मी प्रशासनाला ऑपरेशन थिएटर ठरवायला सांगितलं.
मी केस घेणार असल्याचं जाहीर केलं. ते मला वेड्यात काढत होते. कदाचित मी होतोही.
ऑपरेशनच्या आदल्या रात्री, मी  माझ्या अंधारलेल्या ऑफिसमध्ये बसलो होतो. बाहेर शहर झगमगत होतं — आत टांगणीला लागलेल्या एका जीवाबद्दल पूर्णपणे उदासीन असलेलं.
मी घाबरलो होतो. दगडासारखे स्थिर असणारे माझे हात थरथरत होते. स्कॅन पुन्हा पुन्हा पाहिला.
कुठलाच मार्ग नव्हता. कुठलीच आशा नव्हती. हे आत्मघातकी मिशन होतं.
मी विज्ञानावर विश्वास ठेवणारा माणूस आहे.
स्कॅलपेल, टाके, रक्तदाब — ह्यांवर. पण माझ्या टेबलावर, वैद्यकीय जर्नल्सच्या ढिगाऱ्यामागे, एक लहानसं, प्लास्टिक लॅमिनेट केलेलं वैद्येश्वराचं चित्र आहे. माझ्या आजीनं मेडिकल कॉलेज सुरू करताना दिलं होतं.
ती म्हणाली होती —
“औषध शरीरावर उपचार करतं, पण माणसाला देव बरा करतो.”
मी ते चित्र हातात घेतलं. कोणतीही औपचारिक प्रार्थना केली नाही.
फक्त गौरीची फाईल हातावर ठेवली, देवाच्या प्रतिमेकडे पाहिलं आणि अंधारात हळूच बोललो —
“हे प्रभो…
या वेळेला माझे हात अपुरे पडतायत.
मी इथे फक्त एक मेकॅनिक आहे.
उद्या सकाळी तुम्हालाच ऑपरेशनमध्ये यावं लागेल.
मी हात देतो…
पण बुद्धी तुम्ही द्या.
आज सर्जन तुम्हीच आहात.”
दुसऱ्या दिवशी ऑपरेशन थिएटर मध्ये गोठवून टाकणारं थंड वातावरण होतं. तणावानं भरलेलं. नर्सेस शांत होत्या. भूलतज्ज्ञ माझ्याकडे पाहायलाच तयार नव्हते.
सगळ्यांना माहित होतं — आपण एका अटळ सत्याकडे चाललो आहोत. तिचा मृत्यू अटळ होता.
ऑपरेशन सुरू झालं. स्कॅनपेक्षाही परिस्थिती वाईट होती. रक्तवाहिनी कागदासारखी पातळ, आणि जणू संतापून धडधडत होती. एक चुकीचा श्वास, एक सूक्ष्म कंप — आणि सगळं संपणार होतं.
मी मायक्रो-कात्री उचलली.
तो क्षण होता. Widowmaker क्षण. या क्षणाच्या अलीकडे होतं जीवन आणि पलीकडे उभा होता केवळ मृत्यू!
आणि ते घडलं. खोलीत पूर्ण शांतता पसरली.
फक्त शांत नाही — पोकळी.
मॉनिटर्सचे आवाज दूर कुठेतरी विरून गेले.
माझ्या खांद्यांवरून एक विलक्षण उब पसरली, हातांमधून बोटांपर्यंत वाहत गेली. तो अ‍ॅड्रेनालिन नव्हता. ही होती… शांतता.
गंभीर, भारलेली शांतता.
माझे हात वेगाने हलू लागले. स्पष्टच सांगतो —
मी ते हलवत नव्हतो, मी ते हलताना पाहत होतो.
मी यापूर्वी कधीच न शिकलेली कौशल्ये वापरत होतो. सत्तर वर्षांच्या माणसाला अशक्य असलेली गती आणि अचूकता माझ्या बोटांत कुठूनतरी आली होती. मेंदूच्या देठाजवळ, मिलिमीटर अंतरावर, क्षणाचाही संकोच न करता काम चालू होतं. दिसतही नसणाऱ्या ठिकाणी मी नेमक्या क्लिप्स लावत होतो — कुठलीतरी दैवी जाणीव मला मार्ग दाखवत होती.
“BP स्थिर आहे…” भूलतज्ज्ञ आश्चर्याने कुजबुजला.
मी उत्तर देऊ शकलो नाही.
मी एका तंद्रीत होतो.
माझ्या मागे कुणीतरी उभं आहे, माझ्या कोपरांना दिशा देत आहे, मनगट स्थिर करत आहे — अशी तीव्र जाणीव होती.
क्षणभर वाटलं, खरंच दुसराच कोणी डॉक्टर टेबलजवळ उभा आहे.
पंचेचाळीस मिनिटांनी मी शेवटचं उपकरण ट्रेमध्ये ठेवलं.
“अ‍ॅन्युरिझम संपलं आहे, नसेवर आलेलं फुगीरपणा गेला आहे.” मी म्हणालो.
“आता बंद करा.”
थिएटरमध्ये एकच गोंधळ उडाला. नर्सेस रडत होत्या.
रेसिडेंट्स मॉनिटर्सकडे अविश्वासाने पाहत होते.
एक थेंबही रक्त गेलं नव्हतं.
ते अशक्य होतं — पण परिपूर्ण होतं.
मी गाऊन काढून हात धुण्याच्या ठिकाणी गेलो.
आरशात पाहिलं. अशा ऑपरेशननंतर मी नेहमी थकलेला, घामाघूम, पाठ दुखणारा असतो. आज मला यापैकी काहीही जाणवत नव्हतं. मी शांत होतो. अजिबात थकलो नव्हतो. मी माझ्या सुरकुतलेल्या, वृद्ध हातांकडे पाहिलं. आज त्यांनी एका आईला वाचवलं होतं. एका छोट्या मुलीला अनाथ होण्यापासून वाचवलं होतं.
पण सत्य मला माहीत होतं.
मी ऑफिसमध्ये परत गेलो, वैद्येश्वराचं ते छोटंसं चित्र उचललं आणि खिशात ठेवलं. एका आठवड्यानंतर मी डिस्चार्जच्या कागदावर सही केली. गौरी तिच्या मुलीचा हात धरून बाहेर पडली. डोळ्यांत अश्रू, मला हिरो… किंवा देव म्हणत होती. मी हसलो आणि मान हलवली.
“मी एकट्याने नाही केलं,” मी म्हणालो.
तिला वाटलं, मी टीमबद्दल बोलतोय.
पण त्या दिवशी मुख्य सर्जन कोण होता, हे मला माहीत होतं.
विज्ञान 'कसं' हे सांगू शकतं. रक्तप्रवाह, नसांचं जाळं — सगळं सगळं.
पण 'का' — हे कधीच सांगू शकत नाही.
अशक्याच्या समोर उभा असलेला माणूस अचानक मार्ग कसा शोधतो, हे विज्ञान समजावू शकत नाही. कधी कधी स्वीकारावं लागतं —
आपण फक्त एक साधन आहोत. आणि त्या मंगळवारी, ऑपरेशन थिएटर क्रमांक ४ मध्ये,
खरा वैद्य — परमवैद्य — स्वतः हजर होता.
कधीही आशा सोडू नका.
स्कॅन काळा असला तरी,
जग संपलं असं म्हणत असलं तरी.
चमत्कार नेहमी वीज-गडगडाटासह येत नाहीत.
कधी कधी ते फक्त स्थिर हातांमध्ये…
आणि शांत प्रार्थनेत येतात.
जय वैद्येश्वर.
सर्व कृतींच्या पाठीमागील शक्ती दाखवणारी अतिशय सुंदर कथा.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...