माझ्या मैत्रिणीने भावबंधाचा सांगितलेला किस्सा मी तिच्याच शब्दात सांगते. सोनाक्षी आता चोवीस वर्षांची झालीय. IT ची इंजिनियर आहे. वागायला बोलायला एकदम तडक फडक..चार चार क्लायंट्स एकसाथ हँडल करते. परवाच तिच्याच एक मैत्रिणीच्या लग्नाला गेले आणि दोघातिघांनी विचारले तुमच्याकडले लाडू कधी? मी पण तर होतेच शोधात कोणी हिला समजावून घेणारा मिळतोय का एखादा , IT वाला असला की बरं जुळेल दोघांचं म्ह्णून. हळू हळू चौकशी करताना समजले की आपल्या मनासारखी स्थळे हवी असतील तर मंडळात नाव नोंदवाव लागत. घरात बोलले तर लेकिनी उडवूनच लावलं,ह्यांना बोलायला गेले ,तर नेहमी प्रमाणेच तुला वाटतंय न मग नोंदव नाव म्हणून मोकळे. तर कालच चांगला दिवस होता घेतलं देवच नाव आणि टाकलं नाव नोंदवून,फॉर्म भरला,पैसे भरले,माझ्या काय अपेक्षा आहेत ते भरले.चांगले असलेले 2/3फोटो जोडले म्हणजे पूर्ण कापड्यातले हो.....नाहीतर आमचं ध्यान... घरात तर......जाऊ द्या ...कितीही गोडवे गायले तरी शेवटी आपलंच लेकरू आहे,आपण कधी कशाचं बंधन घातलच नाही.
आज शनिवार, सहज रात्री त्या मंडळाच्या साईटवर पाहिलं तर तर चक्क दोन तीन स्थळ आले होते. त्यातलाच ओंकार कुलकर्णी,आयटी वाला,जबरदस्त स्थळ होतं, दिसायला पण रुबाबदार वाटला, जुजबी माहिती वाचली,चक्क माझ्या सगळ्याच आपेक्षात बसत होता,तशी सोना पण माझ्या ऐकण्यातच होती. यांना दाखवलं ,पण तेवढ्यात कोणाचा तरी फोन आला आणि बोलणं राहूनच गेलं. उद्या बोलू म्हणून शांत बसले. रविवार सकाळ ,म्हणजे बापलेक न चुकता टेनिस खेळायला जाणार .दोघेही ड्रेस घालून छान तयार झाले,आज मलाच माझी लेक सुंदर दिसू लागली होती. मी वळणार तेवढ्यात लॅन्ड लाईनवर फोन आला,यांनी जाताजाता उचलून मला ओरडून सांगितलं कोणी ओंकार कुलकर्णी येतोय 10 वाजता,मी अहो अहो म्हणे पर्यंत हे दोघे पसार झाले.
मी आपली चाटच पडले,कालच या मुलाने इंटरेस्ट पाठवला आणि आज चक्क घरीच येतोय, किती जण येणार, काय, काहीच माहिती नाही?
कितीही ऐकण्यातली असली तरी सोनाला तिची स्वतः ची काही मतं नक्कीच होती.आणि हे काय म्हणतील? त्यांचा नको विचार घ्यायला ! मला बाई चुटपुट लागून राहिली. मी लगेच त्यांना फोन लावला पण खेळायला जायचं म्हणून बापलेकिनी फोन घरीच ठेवले होते. घड्याळात बघितलं तर साडे नऊ वाजत आले.म्हणजे अर्ध्या तासात हा येणार आणि त्याच्यानंतर हे दोघे बापलेक आणि त्यात सोना शॉर्टस मध्ये ,कप्पाळ माझं, आपण आजून तरी मुलगी शॉर्टस मध्ये दाखवायला नेत नाही. बरं फ्लॅटला मागच दार पण नसतं की बाई मागच्या दराने आत ये म्हणायला ,मी पुरती गडबडून गेले. काय करू म्हणत जरा घर साफ केलं,आणि आपण स्नान करून बसावं म्हणून तयार झाले. बरोबर दहा वाजता आले की 'ओंकारराव'.....मी आजूबाजूला पाहिलं .....एकटाच????
आशा वेळी तर पाच सात तरी लोक असतात बरोबर. हे ही नसे थोडके,असे म्हणून मी त्याला आत बोलावलं, पाणी दिलं, तसं फोटोतल्यापेक्षा तो खूपच हॅन्डसम दिसत होता, मला तो चांगल्या सुशिक्षित घरातला वाटला. मी त्याची जुजबी चौकशी केली,तो अगदी छान कम्फर्टेबली गप्पा मारू लागला. त्यानेच सांगितलं की तो आधीची कंपनी बदलून आत्ताच एक महिन्यापूर्वी सोनाच्याच कंपनी मध्ये जॉईन झालाय. तेवढ्यात हे आणि सोना आलेच खेळून परत. गोरिगोमटी सोना मला फारच सुंदर दिसली त्यावेळी, घरात आल्या आल्या सोनाने एक मोठी स्माईल दिली त्याच्याकडे पाहून आणि घरात पळाली.मी यांना ओळख करून दिली आणि थोडी कल्पना दिली प्रसंगाची.
घरात आले,सोनाला एक छानसा ड्रेस घालायला सांगितलं
आणि स्वयंपाकघरात आले काही खायला करू म्हणून,पण कान मात्र बाहेरच होते. फटाफट नाश्त्यासाठी प्लेट्स भरल्या आणि कॉफी घेऊन सोनाला बाहेर ये म्हणून सांगितले. बाहेर आपलं यांचं आम्ही असे आम्ही तसे,आपलंच गुणगान कौतुक चाललेलं,अरे त्याची काही चौकशी कराल का ? सोना कॉफी घेऊन बाहेर आली,आणि छान ओळख असल्यासारखी गप्पा मारू लागली. थोड्या वेळात तो जाण्यासाठीं निघाला आणि एकदम म्हणाला," काकाकाकू नमस्कार करतो".
मी मनात बोलले मुलगा संस्कारी दिसतोय
तेवढ्यात सोना बोलली ,"आग आई ,ओंक्या आहे तो कुलकर्णी काकांचा."
माझ्या डोक्यात लक्ख प्रकाश पडला, मी कितीतरी मागे गेले, तशीच यांचीही अवस्था झाली.
आम्ही नागपूर ला होतो तेंव्हा आमच्या शेजारी कुलकर्णी राहात होते. त्यांचा मुलगा आणि माझी सोना यांची चांगलीच गट्टी होती आणि आमचे पण खूप छान घरोब्याचे संबंध होते. मुले एकत्र खात पीत असत, मिळून शाळेत जात असत,मुलांना एकमेकांकडे सांभाळायला सोडून आम्ही बिनधास्त बाहेरची कामे करत असू. सोनाला त्यांच्याच घरी राहायचं असायच. तेंव्हा कुलकर्णी नेहमी चिडवत असत,"आता तिला जर घेऊन गेला नाहीत तर सून म्हणूनच ठेऊन घेतो."
चांगले तीन चार वर्षे आम्ही एकत्र होतो.खूप छान होते ते दिवस. मग आम्ही पुण्याला शिफ्ट झालो आणि ते थोड्या दिवसांनी दिल्लीला.अधूनमधून फोन होत होते.नंतर थोडं मागे पडलं. ओंकार सांगू लागला,"परवा रात्री बाबांनी विवाहमंडळाच्या साईट वर सोनाला बघितलं, पूर्ण माहिती वाचल्यानंतर संदर्भ जुळले,त्यांनी मला आणि आईला सांगितलं. योगायोगाने मी आणि सोना एकाच कंपनी मध्ये काम करतो,मी कालच बोललो तिला आणि ठरवलं तुम्हा दोघांची फिरकी घेऊ या थोडी."
"हे घ्या बोला बाबांना, त्या दोघांना कोण घाई झालीय तुम्हाला बोलण्याची,चार मिस कॉल येऊन गेले त्यांचे. ते समोरच्या हॉटेल मध्ये बसले आहेत माझ्या फोन ची वाट पहात."
हे नेहमीप्रमाणे गडगडाटी हसले आणि फोनवर कुलकर्णीना म्हणाले ,"कुलकरण्या,अर्ध्या तासात घरी पोहोंचला नाहीस तर तुझ्या पोराला घरजावाई करून ठेऊन घेतो बघ."
मी हळूच डोळे टिपले,देवापुढे साखर ठेवली आणि बोलले किती छान भावबंध जुळवलेस देवा, असाच आशिर्वाद राहू दे लेकरांवर........
सौ अश्विनी चौधरी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा